मुंबई : काही दिवसांपूर्वी आरे वसाहतीतील बंद पडलेल्या जैवइंधन सयंत्राजवळ सापडलेली बिबट्याची तीन पिल्ले नेण्यासाठी मादी बिबट्या तेथे आलीच नाही. मादी बिबट्या तेथे न फिरकल्याने अखेर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिबट्याची ही तीन पिल्ले ताब्यात घेतली.

आरे परिसरातील विहिरीच्या आकाराप्रमाणे दिसणाऱ्या जैवइंधन सयंत्राजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळली होती. स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात वन विभागाला माहिती देताच घटनास्थळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी, ठाणे वनक्षेत्र आणि बिबट्या बचाव पथक पोहोचले होते. दरम्यान, बिबट्याची ही पिल्ले साधारण एक महिन्याची आहेत. त्यांच्या आईने त्यांना तेथे ठेवले असावे असा अंदाज आहे. त्यामुळे ती तेथे येऊन पिल्लांना घेऊन जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा >>> महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात शिवडी पोलिसांना यश; झुडूपांमध्ये सापडला मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याच्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लाईव्ह सीसी टीव्ही कॅमेरे आणि पाच ट्रॅपिंग कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवण्यात येत होती. दरम्यान, आठ-दहा दिवस बिबट्या मादीची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र ती तेथे न फिरकल्यामुळे या तीन पिल्लांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. ही पिल्ले सुरक्षित असून त्यांना उद्यानात हलविण्यात आले, अशी माहिती वनपाल सुधीर सोनावले यांनी दिली. वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथक, आरे कॅमेरा ट्रॅपिंग पथक आणि वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन संयुक्तरित्या बिबट्याच्या पिल्लांची देखभाल करीत होते.