शिवसेना नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली का? असं प्रश्न विचारला असता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. “रामदास कदम देखील शिवसेनेचे नेते आणि कडवट शिवसैनिक आहेत. ते अनेक वर्षे आमदार आणि मंत्री होते. सुनिल शिंदे हे देखील कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडून त्याग केलाय,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सुनिल शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व केलं. सुनिल शिंदे वरळीचे आमदार होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती जागा सोडली. हा त्यांचा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या त्यागाचं निष्ठेचं स्मरण ठेवलं आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर आणण्यासाठी उमेदवारी दिली.”

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले…

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर बोलणं टाळलं. ते म्हणाले, “रामदास कदम यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलंय. ते अनेक वर्षे आमदार होते, अनेक वर्षे मंत्री होते. विधान परिषदेत देखील त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलंय. ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही एकत्र काम करू.”

हेही वाचा : आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत

रामदास कदम मार्दर्शकाच्या भूमिकेत राहणार का?

रामदास कदम मार्दर्शकाच्या भूमिकेत राहणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मी काय मार्गदर्शक आहे का? असा प्रति प्रश्न विचारला. “आम्ही पक्षाचं नेतृत्व आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्वांना पक्षाच्या नेतेपदी नेमलं आहे. आम्ही अनेक वर्षे पक्षाचं काम करतो. कुणी नाराज होण्याचं कारण नाही,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”

संजय राऊत म्हणाले, “कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.”

“भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला”

“नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या प्रकारे व्यापारासाठी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपाच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत नाही”

संजय राऊत म्हणाले, “जसं मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जालियनवाला बागेत देखील ब्रिटिशांनी आमच्या विरांना चिरडलं, त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेसारखं शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असंही राऊतांनी नमूद केलं.