शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मोठं विधान केलं आहे. “सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा,” अशी मागणी संजय राऊतांनी केली. तसेच हा लाठीहल्ला का करण्यात आला याचंही कारण सांगितलं. ते रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सरकार वैफल्यग्रस्त झालं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही. त्यांनी एका बाजूला चर्चा केली आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला केला. हा काय प्रकार आहे. ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीहल्ला सुरू झाला त्यावेळी मुंबईत इंडिया गटाची जोरदार बैठकही सुरू होती. महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण माध्यमे उद्धव ठाकरे काय बोलतात, राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष देऊन होते.”

“माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी लाठीहल्ल्याचे आदेश दिले का?”

“ही बैठक देशभरात दाखवली जात होती. त्यावरील माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी या लाठीहल्ल्याचे आदेश दिले का? मराठा समाजाने आतापर्यंत इतके मोर्चे काढले. ते सर्व मोर्चे शांतपणे, शिस्तबद्धपणे काढले. त्यांनी लाखो लाखोंचे मूक मोर्चे काढले. कधीही त्यांच्याकडून बेशिस्तपणा घडला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“…तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा”

संजय राऊत पुढे म्हणाले, “आधीच्या मोर्चांमध्ये आंदोलकांसह पोलिसांनीही या संयम राखला. हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही घडलं आहे. तेव्हा पोलिसांनी लाठी उगारली नाही. मराठा समाजातील आंदोलकांनी संयम सोडला नाही. मग काल अचानक जालन्यात हे का घडलं? याची सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा.”

हेही वाचा : “अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा…”; संजय राऊत शिंदेंसह मोदी-शाहांवर काय बोलले? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…म्हणून सरकारने जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला”

“मी परत सांगतो, मुंबईत शिवसेनेने यजमानपद भुषवलेल्या देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीला गालबोट लागावं म्हणून हा लाठीहल्ला केला. त्यासाठी मराठा तरुणांचे, महिलांचे, वृद्धांचे, मुलांचे बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.” असा आरोप संजय राऊतांनी केला.