शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आणि राज्यातील राजकारणाची समीकरणं पुन्हा एकदा बदलली. यामुळे आता पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (८ जुलै) पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “हा प्रश्न गेले २२ वर्षे वारंवार विचारला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत देशात हुकुमशाही, दडपशाही, पैशाचं राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल, तर या प्रवृत्तीविरोधात खरोखर मनापासून प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे त्या सर्व घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे.”

“अनेक दगडांवर पाय ठेऊन राजकारण करता येणार नाही”

“अनेक दगडांवर पाय ठेऊन या महाराष्ट्रात कुणालाही राजकारण करता येणार नाही. शिवसेनेने एक भूमिका घेतली आहे. शिवसेना झुकली नाही आणि वाकली नाही. जे घाबरणारे स्वार्थी लोक होते ते आमच्यातून पळून गेले. जे कडवट निष्ठावान राहिले आहेत त्यांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीत आपला झेंडा रोवेल,” असा मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: “त्या गटातील आमदारांना बसमध्ये बसवून एका हॉटेलमध्ये ठेवलं, म्हणजे…”, आमदार रोहित पवारांचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मनातील शंका दूर करून एकत्र यायला काहीच हरकत नाही”

“शरद पवारांचा या वयात संघर्ष सुरू आहे. त्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींचा संघर्ष सुरू आहे. आम्ही सर्व संघर्षात एकत्र आहोत. कारण देश आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्रावरील डाग पुसावा, या महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय मिळावा अशी इच्छा आहे त्यांनी मनातील शंका दूर करून एकत्र यायला काहीच हरकत नाही,” असं आवाहनही राऊतांनी केलं.