ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसाब मतदारसंघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटल्याच्या आरोपावर सडकून टीका केली. “सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, त्यांनी हीच निर्भयता निवडणुकांना सामोरं जाण्यात दाखवावी, असं आव्हान दिलं. ते शनिवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे. हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. निवडणुकीला बेडरपणे सामोरं गेलं पाहिजे.”

“भाजपा निवडणूक घ्यायला निर्भयता का दाखवत नाही?”

“भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, पैशांचं वाटप करून आमदारांना विकत घेतं, हीच निर्भयता भाजपा निवडणूक घ्यायला का दाखवत नाही?” असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला. तसेच आमची इच्छा आहे की, निवडणुका ताबोडतोब घ्याव्यात, असंही नमूद केलं.

“बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं”

कसब्यात पैसे वाटण्याच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात मागील मोठा काळ पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं हे पुराव्यासह उघड झालं. पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झालं आहे.”

हेही वाचा : शिवसेनेची मालमत्ता व संपत्ती ते ब्राह्मण समाजाची नाराजी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांची गाजलेली वक्तव्यं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पैसे वाटण्याचं काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होतं”

“पैसे वाटण्याचं काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होऊ शकतं. त्यामुळे कसब्याचे महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण याआधी भाजपाच्या कालखंडात पोलिसांच्या गाडीतून पैशांची आवक-जावक, वाटप झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.