शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी बंडखोर शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. “जे आमदार आदल्या दिवशी आपल्या मतदारसंघात जाऊन रडत होते ते शिवसेना सोडून गेले तेव्हा आश्चर्य वाटलं. मात्र, अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (५ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “काल तर एक आमदार गेले त्यामुळे आश्चर्यच वाटलं. आदल्या दिवशी हेच आमदार त्यांच्या मतदारसंघात जाऊन रडत होते. हिंगोलीत लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं. एक निष्ठावान म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता व मतदार पुन्हा उभं करणार नाही, असं मी खात्रीने सांगतो.”

“…तर शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील”

“२०० जागांची भाषा राज्यातील नेते करत नाहीत, तर दिल्लीतील नेते करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटलं आहे तुम्ही आज मध्यावधी निवडणुका घ्या. आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आता निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील. आमच्यात हिंमत आहे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही खरे आहोत. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“तुम्ही देशातील कोणत्याही पक्षाला हायजॅक करू शकत नाही”

“पैशांच्या आणि दिल्लीतील केंद्रीय तपास संस्थांच्या बळावर तुम्ही देशातील कोणत्याही पक्षाला हायजॅक करू शकत नाही. ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे की या आमदारांना केवळ पैसेच नाही, तर आणखी काही मिळालं आहे. या आणखी काहीमध्ये मोठं रहस्य आहे. ते लवकरच समोर येईल,” असंही राऊतांनी नमूद केलं.

संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी

कनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र हेच बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? याबद्दल विधिमंडळात माहिती दिली आहे.

“ते घाबरत होते, पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला”

“संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे. आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

“नोटीस दिलेले १४ आमदारही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक”

दरम्यान, शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, “ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत. तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.”

पाहा व्हिडीओ –

“बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही”

संजय राऊत म्हणाले, “नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी हे कसं केलं, त्यामागे कोणती महाशक्ती काम करत होती हे लोकांना माहिती आहे. ममता बॅनर्जी यांनी यावर खूप महत्त्वाचं वक्तव्य केलंय. बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही, तर आणखीही काही मिळालं आहे. आणखी काही मिळालं आहे यात खूप मोठं रहस्य आहे. सुरतमध्ये, गुवाहाटी, गोवा, मुंबईमध्ये हे आमदार ११ दिवस फिरत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.”

“आता शिंदे-फडणीस सरकारने महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे”

“आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत”

संजय राऊत यांना गुलाबराव पाटलांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक पक्षाचं काम करत होते. ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात ते पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.”

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : “५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कारणं सांगू नका, आता मंत्री झालात, काम करा”

“जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.