शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या एका माणसाने गोळीबार केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिल्याचं ANI या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय आहे संजय राऊत यांची पोस्ट?

महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर काय होती राऊत यांची पोस्ट?

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत..राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या!

अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या इसमाने गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिसने त्यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. २ फेब्रुवारीला गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे.

फेसबुक लाईव्ह आणि मग गोळीबार

अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाइव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हिडीओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊण तास सुरूच होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या मॉरिसची स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या

मॉरिसची आत्महत्या

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याआधी त्याने फेसबुक लाईव्हही केलं होतं. मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.