धवल कुलकर्णी

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष दिवंगत इंदिरा गांधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटायच्या असं वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यावर जोरदार वाद झाला. त्यानंतर राऊतांना हे विधान मागे घ्यावे लागले. सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांनी याबाबत खुलासा करताना करीम लाला हे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आणि राज्यपालांना सुद्धा भेटले होते असे म्हटले आहे.

त्याच वेळेला करीम लाला हे पठाणांचे नेते होते आणि ते गुंड होते की नाही हे पोलिसच ठरवतील असे राऊत म्हणाले. काँग्रेसच्या नव्या पिढीतल्या नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे व्यक्तीमत्व, राजकारण आणि प्रखर राष्ट्रवाद समजून घेतला पाहिजे अशी पुस्ती त्यांनी जोडली.

“काँग्रेस पक्षातल्या नव्या पिढीने इंदिरा गांधी काय होत्या ते समजून घेतले पाहिजे पण दुर्दैवाने सध्या राजकीय उठवळपणा खूप झाला आहे. करीम लालांची भेट म्हणजे गुन्हा आहे का? काँग्रेसवाल्यांनी एवढं का चिडण्याची गरज काय? करीम लाला हा पठाण यांचा नेता होता आणि खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाई खिदमतगार संस्थेचे काम करायचा. करीम लाला ने पुख्तान- ए- हिंद नावाची एक संस्था काढली होती. खान अब्दुल गफार खान मुंबईला यायचे त्यावेळेला करीम लालाच्या घरीच उतरायचे. नव्या पिढीला हे माहीत नसेल तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व त्यांचा राजकारण्यांचा प्रखर राष्ट्रवाद समजून घेतला पाहिजे. खान अब्दुल गफार खान यांना फाळणी नको होती. भारतात मागे राहिलेल्या पठाणांनी देशाच्या मुख्य प्रवाहात यावे पण दुर्दैवाने हा इतिहास भूगोल काही लोकांना माहीत नाही,” असे राऊत लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना म्हणाले.

“करीम लाला फक्त इंदिरा गांधींच नाही तर अनेक राज्यकर्त्यांची भेट घ्यायचे ते प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. ते अनेक पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना, मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सुद्धा भेटले. करीम लाला आहे पठाणांचे अनभिषिक्त सम्राट होते हे आपण लक्षात घेतला पाहिजे. ते गुंड होते की नाही हे पोलीस ठरवतील. एकेकाळी अंडरवर्ल्डच्या क्षेत्रात असलेल्या लोकांना एक सामाजिक आणि राजकीय वलय होतं आणि त्यांचे राजकीय संबंध अत्यंत ताकदीचे होते. त्या संबंधांच्या जोरावर ते अनेक प्रश्नांची सोडवणूक सुद्धा करायचे आजच्यासारख्या खंडण्या आणि खून त्या काळात होत नसत,” अशी माहिती एकेकाळचे क्राईम रिपोर्टर असलेले संजय राऊत यांनी दिली.