Sanjay Raut : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर पुन्हा एकदा भेट झाली. शिवाय दोघांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा राजकीयच होती असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांमध्ये मागच्या तीन महिन्यांत पाच भेटी झाल्या आहेत. मातोश्रीवर रविवारी पार पडलेली भेट ही राजकीय होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पाच प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती निश्चित होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन युतीची घोषणा करतील. मुंबईसह महाराष्ट्रात २७ महापालिका आहेत. हा काही खेळ नाही. प्रत्येक जागांवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडे परिस्थिती वेगवेगळी आहे. या सगळ्यावर आमच्या चर्चा होत आहेत. प्रत्येक महापालिकेत दोन्ही पक्षांचे प्रमुख लोक चर्चा करत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कुठल्या महापालिका एकत्र लढण्यावर ठाकरे बंधूंचं एकमत?

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमत आहेच. शिवाय अनेक महापालिका आहेत जिथे शिवसेना आहे. मनसेची मदत कुठे घेता येईल? राष्ट्रवादीची ताकद जिथे आहे तिथे त्यांची मदत घेऊ. मुंबईचा महापौर मराठी होईल, मराठी बाण्याचा माणूस होईल. मराठी बाण्याचे म्हणजे भाजपा सांगतात किंवा मिंधे सांगतात तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊन आमच्या १०५ हुतात्म्यांसमोर दंडवत घालेल त्यांचाच महापौर होईल. असा बाणा फक्त शिवसेना आणि मनसेतच आहे. होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह मी म्हणतो आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मविआत या हे मी एकटा राज ठाकरेंना सांगू शकत नाही-संजय राऊत

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. त्यात शिवसेना प्रमुख पक्ष आहे, त्यात नवा पक्ष येणार असेल तर आम्ही विचार करतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित लक्षात घेऊ. महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत हे राज ठाकरेंना सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही. मविआमध्ये तीन पक्ष आहेत. आत्ता शिवसेना आणि मनसेच्या चर्चा सुरु आहेत. आमचे मविआशी उत्तम संबंध आहेत. मविआच्या नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष नाहीत, त्या अमित शाह यांच्या कंपन्या-राऊत

महायुती हे काय झेंगाट काय? शिंदे वगैरे काही शिवसेना नाही. शिंदे म्हणजे अमित शाह यांची कंपनी आहे. अजित पवारांचा पक्षही कंपनी आहे. ती पण अमित शाह यांचीच आहे. मुख्य कंपनी भाजपा आहे. बेनामी प्रॉपर्टी अमित शाह यांच्या आहेत. अमित शाह यांना वाटलं की त्या कंपन्या बंद होतील. महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना, मनसे युती खरी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.