शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, "उद्या (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. तेव्हा मी तर असेलच, पण शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील. पक्ष म्हणून आम्ही येऊ. केंद्रीय तपास यंत्रणांची शिवसेना, ठाकरे परिवारावर जी काही दादागिरी सुरू आहे, खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सर्वांना उत्तरं मिळतील." "भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील" "काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे." हेही वाचा : नेहरुंचं नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या मोदींना राऊतांचा टोला; म्हणाले, “गोवा स्वतंत्र झाला तेव्हा…” "मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा," असंही राऊतांनी नमूद केलं.