scorecardresearch

नेहरुंचं नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या मोदींना राऊतांचा टोला; म्हणाले, “गोवा स्वतंत्र झाला तेव्हा…”

“१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी गोवा काही तासांतच स्वतंत्र झाला असता; मात्र पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होण्यास राज्याला १५ वर्षे लागली”

Modi And Raut
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देताना केली टीका (प्रातिनिधिक फोटो)

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवले असते, तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी गोवा काही तासांतच स्वतंत्र झाला असता; मात्र पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होण्यास राज्याला १५ वर्षे लागली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेल्या या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. जे सध्या गोव्याच्या स्वांतंत्र्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत त्या विचारसणीचे लोक गोवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठे होते?, असा प्रश्न राऊत यांनी विचारलाय.

साधा मुख्यमंत्री गेला तरी…
मोदींच्या सभेनंतर गोव्यामध्ये भाजपावर मतदरांचा आत्मविश्वास वाढल्याचं फडणवीस सांगतायत असं राऊत यांना सांगत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये २० सभा झालेल्या, केरळमध्येही झाल्या होत्या. पंजाबमध्येही त्यांच्या सभा सुरु आहेत. पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असतो. त्यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा असतात. साधा मुख्यमंत्री गेला तरी लोकांच्या अपेक्षा असतात हे तर पंतप्रधान आहेत,” असं राऊत म्हणाले.

कुठे होते गोव्याच्या लढ्यात?
‘गोल्डन गोवा’ हा नारा देताना काँग्रेसने गोव्याला १४ वर्ष वनवासात नेलं, अशी टीका पंतप्रधानांनी केल्याचा संदर्भ देत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “गोवा गोल्डनच आहे,” असं म्हटलं. “या गोल्डन गोव्यात तुम्ही नंतर आला. गोवा स्वतंत्र झाला, इंदिरा गांधींनी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. नेहरुंनी येथे मोठं काम केलंय. गोवा स्वतंत्र झाला तेव्हा आज बोलणारे लोक कुठे होते त्या लढ्यात?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. पुढे बोलताना, गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र होता, राममोहन लोहिया होते. गोवा मुक्तीसाठी लढणाऱ्या इतर लोकांनी मिळून गोवा स्वतंत्र्य केलाय, असंही राऊत म्हणाले.

गोव्यावर एका पक्षाचा हक्क नाही…
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये गोव्याशी भावनिक नातं असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून गोव्यातील भाजपाच्या बैठकीमध्येच मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली होती. त्यावरुन छेडलं असता राऊत यांनी, “अख्ख्या देशाला गोवा भरभरुन देतो. गोव्याने बाळासाहेबांना, लोहियांना भरभरुन दिलं आहे. गोव्यावर एका राजकीय पक्षाचा हक्क कधीच राहिला नाही,” असं राऊत म्हणाले.

चीनचं नावही घेत नाही…
“आज आमच्या समोर सर्वात मोठी चिंता लडाखमधील आहे. तुम्ही लडाखला कधी स्वतंत्र करताय ते सांगा. गोवा स्वतंत्र होऊन जमाना लोटला. तुम्ही चिनी सैनिकांना कसं बाहेर काणमार सांगा. तुम्ही साध चीनचं नाव घ्यायला तयार नाहीत,” असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देत लगावलाय.

काँग्रेसचे आमदार फोडता आले म्हणून राज्य करताय
गोव्यात प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळेत. त्यामुळे वेगवेगळे जाहीनाम्यांची घोषणा केली जातेय, असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार असून तो आदित्य ठाकरेंच्या उपस्थित होईल अशी माहिती राऊत यांनी दिली. “काँग्रेस इथला मूळ पक्ष आहे. काँग्रेस इथला राज्यकर्ता पक्ष आहे.काँग्रेसचे आमदार फोडता आले म्हणून राज्य करताय,” असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला.

मराठीतील सर्व गोवा विधानसभा निवडणूक २०२२ ( Goa-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa elections sanjay raut slams pm modi and ask where was bjp when goa was liberated scsg

ताज्या बातम्या