मुंबई : ‘जाने भी दो यारो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘उमराव जान’, ‘कभी हाँ कभी ना’ सारख्या चित्रपटांतून विनोदी चरित्रात्मक भूमिकांमधून लक्ष वेधून घेणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एकाच वेळी दूरचित्रवाणी आणि सिनेमा ही दोन्ही माध्यमे आपल्या विनोदी अभिनयाच्या शैलीने गाजवणारे अभिनेते सतीश शाह गेले काही महिने मूत्रपिंडाशी संबंधित आजाराशी झगडत होते. सतीश शाह यांनी फिल्म टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते. सत्तरच्या दशकांत त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

१९७८ साली सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटात त्यांना बऱ्यापैकी लक्ष वेधून घेईल अशी भूमिका मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ‘गमन’, ‘उमराव जान’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ सारख्या चित्रपटातून भूमिका केल्या. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने. मुजफ्फर अली, सईद अख्तर मिर्झा, कुंदन शाह यांच्यासारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करणाऱ्या सतीश शाह यांनी नंतरच्या काळात तद्दन व्यावसायिक चित्रपटांमधून छोटेखानी भूमिका केल्या.

त्यांची विनोदी अभिनयावरची हुकूमत आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेल्या बहुढंगी व्यक्तिरेखा यामुळे चित्रपट फार नावाजलेले नसले तरी त्यांचा चेहरा लोकांच्या लक्षात राहात असे. चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘यह जो है जिंदगी’, ‘फिल्मी चक्कर’, ‘घर जमाई’ सारख्या मालिकांमधून काम केले.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या इंद्रवर्धन या व्यक्तिरेखेने त्यांना कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीत सहज विनोदी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अगदी मोजक्या कलाकारांपैकी एक असलेल्या सतीश शाह यांचे जाणे त्यांच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांनाही चटका लावून जाणारे ठरले आहे.