मुंबई : सारस्वत सहकारी बँकेने तिच्या सभासदांना हक्कभाग जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. भांडवल उभारणीसाठी हा मार्ग अनुसरणारी ही देशातील पहिलीच नागरी सहकारी बँक आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात सोमवारी सायंकाळी झालेल्या बँकेच्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी या निर्णयाची घोषणा केली.

देशातील सर्वात मोठय़ा नागरी सहकारी बँकेने तिच्या विद्यमान भागधारकांना हक्कभाग जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला सभेने मंजूरी दिली. बँकेच्या महत्त्वाकांक्षी व्यवसाय वृद्धी आणि भविष्यातील प्रगतीच्या दिशेने आवश्यक भांडवल उभारणीत योगदानाची मागणी करणाऱ्या या प्रस्तावाचे उपस्थित सभासदांनी टाळय़ा वाजवून स्वागत केले. ३० सप्टेंबर २०२२ रोजी बँकेच्या भांडवली पर्याप्ततेच्या (सीआरएआर) टक्केवारीनुसार, हक्कभाग विक्रीच्या माध्यमातून साधारण २०० ते ३०० कोटी रुपये उभारण्याचा बँकेचा मानस आहे.

गौतम ठाकूर म्हणाले, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हक्कभाग विक्री असेल. बँकेच्या कार्यक्षेत्रातील आणि विद्यमान सभासदांनाच हे हक्क समभाग दिले जाणार असल्याने त्याला बँकिंग नियमन कायदा आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही परवानगी दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

२७५ कोटींचा निव्वळ नफा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यमान भागधारकांना हक्कभाग देताना ते कोणत्या प्रमाणात आणि किती रुपयांनी द्यायचे याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेतला जाईल. सारस्वत सहकारी बँकेने २०२१-२२ आर्थिक वर्षांत ७१,५०० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा पार केला असून, २७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.