मुंबई : राज्यातील अनेक खासगी व सरकारी रक्तपेढ्या दरवर्षी किमान रक्त संकलन करण्याच्या नियमाला धाब्यावर बसवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वर्षाला किमान दाेन हजार युनिट रक्त संकलित करण्याच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना दिले आहे. मात्र, त्याचवेळी काहीच दिवसांपूर्वी पेढ्यांना रक्त वाया जाते म्हणून मोठी शिबिरे घेण्यासही मनाई केली आहे. नियम मोडणाऱ्या रक्तपेढ्यांना परवाने रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात परवाना देताना वार्षिक दोन हजार युनिट रक्त संकलित करण्यात येईल, असे हमीपत्र रक्तपेढी चालवणाऱ्या संस्थांकडून लिहून घेण्यात येते. मात्र राज्यातील जवळपास ४० खासगी तर काही सरकारी रक्तपेढ्यांकडून या निमयांला धाब्यावर बसविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रक्तसंकलन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या असल्या तरी या रक्तपेढ्या त्याची अंमलबजावणी करत नाहीत.

या रक्तपेढ्या वर्षाला फक्त एक हजार ते १२०० युनिट रक्त संकलित करतात. त्यामुळे उन्हाळा, साथी या काळात रक्ताचा तुटवडा प्रकर्षाने निर्माण होतो. ही बाब लक्षात घेत राज्यातील कमी रक्त संकलित करणाऱ्या जवळपास ४० खासगी रक्तपेढ्या तर काही सरकारी रक्तपेढ्यांना वर्षाला दोन हजार युनिट रक्त संकलन करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत. तसेच दोन हजार युनिट रक्त संकलन न करणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही परिषदेने दिला आहे.

मोठी शिबिरे घेण्यास मनाई

एकीकडे वर्षभरात किमान दोन हजार युनिट रक्त जमा करण्याचे आदेश पेढ्यांना देताना मोठी शिबिरे घेऊ नयेत, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. मोठ्या शिबिरांमध्ये रक्त संकलित होते. मात्र ते योग्य पद्धतीने न साठवल्यामुळे वाया जाते. त्यामुळे मोठी शिबिरे घेऊ नयेत असे परिषदेचे म्हणणे आहे. मात्र छोटी शिबिरे सातत्याने आयोजित करणे जिकीरीचे असल्याचे पेढ्यांचे म्हणणे आहे.

डिसेंबरपर्यंत मुदत

नोटीस पाठविण्यात आलेल्या ४० खासगी रक्तपेढ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत रक्त संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. या कालावधीमध्ये रक्त संकलन न करणाऱ्या रक्तपेढ्यांचा दर पाच वर्षांनी होणारे परवान्याचे नूतनीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तपेढ्यांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर ९० टक्के रक्तपेढ्यांनी नियमाची योग्य अंमलबजावणी केली तर उरलेल्या रक्तपेढ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. पुरुषोत्तम पुरी, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद