माहितीच्या अधिकाराखाली गोंधळ उघड
मुंबई शहरातून दिल्या गेलेल्या जातीच्या दाखल्यांची वैधता पडताळणी ठाण्यातील समितीकडून होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात नंदुरबार, नाशिक समितीने जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. यावरून हे दाखले खोटे असल्याचे सिद्ध होते, असा आरोप माहितीच्या अधिकाराखाली हा बनाव उघडकीस आणणारे सदानंद गावित यांनी केला आहे.
गावित हे सरकारी सेवेतून निवृत्त झालेले उपसचिव दर्जाचे अधिकारी असून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांविषयी शंका आली म्हणून त्यांनी हा सर्व खटाटोप केला. भिल्ल, तडवी, धोडिया, टाकनकार या नावाने पुरोहित, गांधी, श्रीवास्तव यांना प्रवेश कसे मिळाले, असा विचार करत त्यांनी आधी संबंधित महाविद्यालयांमधून माहितीच्या अधिकाराखाली या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना जमा केलेली जात व वैधता प्रमाणपत्रे मिळविली आणि त्यानंतर संबंधित सरकारी यंत्रणांकडे विचारणा करून हा घोटाळा बाहेर आणला आहे. भिल्ल ही धुळे, नाशिक, जळगाव येथे आढळून येणारी आदिवासी जमात आहे. तर तडवी जळगाव, रावेर, चोपडा, यावल येथे आढळून येतात. पण या जमातीच्या नावे शेख, काझी, आझमी या आडनावाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.