schools in maharashtra will celebrate grandparents day mumbai print news zws 70 | Loksatta

राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी

वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.

grandparents day in maharashtra schools
आजी आजोबा प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रविवार १० सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन न करता आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: म्हाडा दुरुस्ती मंडळात बनावट वितरण! पायधुनी पोलिसांकडून चौकशी सुरू

सध्याची कौटुंबिक स्थिती पाहता अनेक आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बराच वेळ घराबाहेर असतात. त्यादरम्यान पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर येते. त्यामुळे मुलांच्या नाजूक मनावर योग्य संस्कारांचा मुलामा देण्यामध्ये आजी आजोबांचा मोठा हातभार लागतो. त्यामुळे आजी आजोबांशी असलेल्या या घट्ट नात्याची ओळख होणे पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. त्यामुळे शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ, गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे असल्याचेही जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: पश्चिम रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी आणखी दोन वर्षे प्रतीक्षा

आजी आजोबांकरिता सदर दिवशी राबविण्यात येणारे कार्यक्रम

– विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून देणे.

– आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन.

– विटीदांडू, संगीतखुर्चीसारख्या खेळांमधून बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे.

– पारंपरिक वेषभूषेमध्ये आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करणे. ( ऐच्छिक )

– महिलांसाठी मेहंदी तसेच इतर उपक्रमांचे आयोजन

– आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगणे. तसेच झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व पटवून देणे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:21 IST
Next Story
मुंबई: म्हाडा दुरुस्ती मंडळात बनावट वितरण! पायधुनी पोलिसांकडून चौकशी सुरू