मुंबई : वयोमानानुसार येणाऱ्या दृष्टीदोषावर आता विज्ञानाने नवा प्रकाश टाकला आहे. ‘एज-रिलेटेड मॅक्युलर डीजेनरेशन’ (एएमडी) या आजारामुळे अंधत्व आलेल्या वृद्धांना पुन्हा दृष्टी देण्यात संशोधकांना यश आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जोसे-अलन सॅहेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात ‘प्रिमा’ नावाच्या सूक्ष्म रेटिनल इम्प्लांटच्या मदतीने ३८ रुग्णांपैकी तब्बल २७ जणांना अंशतः दृष्टी परत मिळाली आहे. या निष्कर्षांचा अहवाल न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाला असून, दृष्टी पुनर्स्थापनेच्या क्षेत्रात हा एक मैलचा टप्पा मानला जात आहे.

अभ्यासात सहभागी झालेल्या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना अक्षरे, शब्द आणि काहींना वाक्ये वाचता आली. काहींनी तर पुस्तकातील पानेही ओळखली. एका रुग्णाने तब्बल ५९ अक्षरे वाचण्याइतकी सुधारणा दाखवली, तर काहींना चेहऱ्यांची ओळख पटू लागली.पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांना पुन्हा पाहण्याची संधी मिळाली आहे, असे डॉ. सॅहेल यांनी सांगितले. संशोधकांच्या मते परत आलेली दृष्टी पूर्णपणे नैसर्गिक नसली तरी ती जीवन बदलणारी आहे. ही दृष्टी कृष्णधवल आणि मर्यादित दृष्टीक्षेत्रात असली तरी रुग्णांना दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण फरक जाणवतो.

प्रिमा ही केवळ दोन बाय दोन मिमी आकाराची व प्लास्टिक फिल्मइतकी पातळ मायक्रोचिप आहे. ती रुग्णाच्या डोळ्यातील रेटिना भागात बसवली जाते. सामान्य परिस्थितीत प्रकाशसंवेदक पेशी प्रकाशाला विद्युत संकेतांमध्ये रूपांतरित करून मेंदूपर्यंत पोहोचवतात, पण एएमडी मध्ये या पेशी नष्ट होतात. प्रिमा चिप या पेशींची जागा घेते. बाह्य उपकरणातून इन्फ्रारेड प्रकाशाच्या रूपात प्रतिमा घेतल्या जातात आणि त्या डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित होऊन मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे रुग्णाला आकार, अक्षरे आणि वस्तू ओळखता येतात. शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांमध्ये डोळ्यांचा दाब वाढणे, रक्तस्राव किंवा रेटिनल फाटणे यासारखे दुष्परिणाम दिसले, मात्र ते नियंत्रणात आले आणि काही महिन्यांत रुग्ण सुधारले. बाराशे महिन्यांनंतर ८१ टक्के रुग्णांमध्ये क्लिनिकलरीत्या अर्थपूर्ण दृष्टी सुधारणा आढळली.

या प्रणालीचे सह-निर्माते आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल पॅलांकर म्हणतात ‘प्रिमा’ प्रणाली वायरलेस आणि अधिक नैसर्गिक कार्यपद्धतीवर आधारित आहे. पुढील आवृत्त्यांमध्ये तिची कार्यक्षमता आणि दृष्टीची गुणवत्ता दोन्ही अधिक सुधारतील. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात वृद्धापकाळातील अंधत्वावर प्रभावी उपचार शक्य होतील असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

भारतातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. वय ६० वर्षांवरील लोकांमध्ये एएमडीचे प्रमाण १.४ ते ३.१ टक्क्यांदरम्यान आहे. काही अभ्यासांनुसार उत्तर भारतात सुरूवातीच्या टप्प्यातील एएमडीचे प्रमाण ५.४ टक्के, तर दक्षिण भारतात ८ टक्के आहे.प्रगत अवस्थेतील एएमडी सुमारे १.३ टक्के प्रकरणांत आढळतो. रुग्णालय आधारित अभ्यासात ६० वर्षांवरील १०,२१७ लोकांपैकी १.६ टक्के लोकांमध्ये एएमडी निदान झाले आहे.

या आकडेवारीवरून भारतात एएमडीचा प्रसार तुलनेने कमी दिसतो, परंतु वृद्ध लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढील काही दशकांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात नेत्ररोगतज्ज्ञांची कमतरता, आधुनिक उपचारांची कमी उपलब्धता आणि जागरूकतेचा अभाव ही मोठी आव्हाने आहेत. तंबाखू सेवन, जादा सूर्यप्रकाश, अपुरी आहारशैली, डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे घटक भारतात एएमडीचा धोका वाढवतात. त्यामुळे या आजाराचे पायर-स्क्रीनिंग, वेळेवर निदान आणि योग्य उपचार याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.रेटिनल इम्प्लांटच्या या नव्या संशोधनाने वृद्धापकाळातील अंधत्वाविरुद्ध लढ्यात आशेचा नवा प्रकाश दाखवला आहे. तंत्रज्ञानाच्या या नव्या झेपेमुळे जगभरातील लाखो वृद्ध रुग्णांना पुन्हा ‘दिसण्याची’ संधी मिळू शकते.जरी ती दृष्टी परिपूर्ण नसली, तरी जीवनाला नव्या अर्थाने उजळवणारी ठरणारी आहे.