मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण जागावाटप जाहीर झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मविआमधील समावेशाचा घोळ सुरू असताना भाजप व शिंदे-अजित पवार गटांमध्येही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपानंतर होणाऱ्या संभाव्य बंडखोरीचा प्रतिस्पर्धी आघाडीने फायदा घेऊ नये, यासाठी दोन्ही गटांनी उमेदवारांच्या घोषणेबाबत ‘पहले आप’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ गेला महिनाभर सुरू आहे. जागावाटप जाहीर करण्यासाठी रोज नवी तारीख देण्यात येत आहे. आता महायुतीचे चित्र गुरुवारी स्पष्ट होईल, असा नवा मुहूर्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असला तरी भाजपच्या मनाप्रमाणे जागावाटप झाले तरच गुरुवारी घोषणा होईल, असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. त्यामुळे आता या दिवशी तरी तिढा सुटणार का, याकडे तिन्ही पक्षांमधील इच्छुक, अन्य नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Polls 2024 : ठाकरे गटाची पहिली यादी आज

दुसरीकडे महाविकास आघाडीतील पेचही अद्याप सुटलेला नाही. भिवंडी आणि सांगली या दोन जागांवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने दावा करून या जागा लढविण्याचे जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये संतप्त भावना आहे. ‘शिवसेना व राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा’, असा इशारावजा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिला. वंचितच्या सहभागाचा विषय आता संपल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. मात्र वंचितला सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. असे असताना नुसती जागांची चर्चा न करता लेखी पत्र द्यावे, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज, बुधवारी अधिकृत भूमिका जाहीर करतील, असेही स्पष्ट करण्यात आले असून वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र सांगलीवरून निर्माण झालेला तिढा व वंचितबरोबर वाटाघाटींमुळे आता ठाकरे गटाने ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका घेतली आहे. पक्षाची यादी आता आज, बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

इच्छुक, नाराजांवर डोळा

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांचे एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. ठाकरे गटाची यादी जाहीर झाल्यानंतरच शिंदे गट उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाने विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यास त्यांना दरवाजा उघडण्याची ठाकरे गटाने तयारी केली आहे. शिंदे गटातून परतीचा ओघ सुरू झाल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे. नेमक्या याच कारणामुळे शिंदे गटाकडून उमेदवारांची घोषणा लांबविली जात असून ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.