मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे (गर्डर) सर्व सुटे भाग अद्याप मुंबईत आलेले नाहीत. त्यामुळे दुसरी तुळई बसवण्याचे काम सुमारे तीन महिने लांबणीवर गेले आहे. या कामासाठी आता ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून रेल्वे हद्दीतील कामे पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यामुळे पुलाच्या कामाचे वेळापत्रक साडेपाच महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे.

हेही वाचा >>> मुंबईः सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी

गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दुसरी बाजू सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर एक बाजू सुरू होण्यास १५ महिने लागले. एप्रिलच्या सुरुवातीला दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ३१ मेपर्यंत तुळई स्थापन करून पोहोच रस्ते तयार करण्याचे व ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल खुला करण्याचे नियोजन होते. दुसऱ्या तुळईचे काही भाग आले असून ते जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र सर्व भाग आले नसल्याने हे सगळे नियोजन कोलमडून पडले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार दुसरी तुळई ३० सप्टेंबरला बसवण्यात येईल. रेल्वेच्या हद्दीतील कामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पूल वाहतुकीला खुला होण्याचा मुहूर्त साडेपाच महिन्यांनी लांबणार आहे.

हेही वाचा >>> उमेदवार नसलेल्या पक्षाला ‘शिवाजी पार्क’; मनसेला सभेसाठी परवानगी

कंत्राटदाराला दंड ठोठावत मुदतवाढ तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाल्यामुळे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराकडून खुलासा मागवला होता. कंत्राटदाराने खुलाश्याबरोबर नवे वेळापत्रकही दिले आहे. खुलाशातील काही कारणे प्रशासनाला पटलेली नसून मागण्यात आलेल्या अतिरिक्त दिवसांसाठी दंड लावण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याच्या मूल्यमापनाने काम सुरू असून दंड आकारूनच मुदतवाढ दिली जाईल, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.