मुंबई : अंधेरी येथे दोन तोतयांनी पोलीस असल्याचे सांगून ७१ वर्षीय वृध्दाला भर रस्त्यात लुटले. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी भिकाजी खाकम (७१) अंधेरी पश्चिम परिसरात राहतात. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास ते सिझर रोडवरून जात होते. त्यावेळी ‘केक्स ऑफ द डे’ या दुकानासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले.

आपण साध्या वेषातील पोलीस असल्याचा दावा त्यांनी केला. या दोघांनी खाकम यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांना भीती घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील कडे असा ६६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खाकम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डी. एन. नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २०४ (३), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आम्ही परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपींचा शोध घेत आहोत, असे डी. एन. नगर पोलिसांनी सांगितले. पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एकांतात गाठून ते लक्ष्य करतात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी बोलतांना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.