मुंबई : राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवेतील १९९३ च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार आणि प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती दिली. गृहविभागाने शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले.

महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण विभागाचे संचालक असलेल्या प्रभात कुमार यांना हे पद उन्नत (महासंचालक दर्जाचे) करून त्याच जागी नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अप्पर पोलीस महासंचालक असलेल्या प्रशांत बुरडे यांना महाराष्ट्र राज्य लोहमार्ग मुंबई हे पद उन्नत करून त्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत बुरडे यांच्या नवनियुक्तीने रिक्त झालेल्या अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या जागी राज्य पोलीस दलातील नियोजन व समन्वय विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली असून व्हटकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक के. एम. एम. प्रसन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, लोहमार्ग मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांची महामार्ग सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे.