मुंबई : स्तनाचा कर्करोग झालेल्या अनेक महिलांना स्तन गमवावे लागतात. मात्र, स्तनांची पुनर्रचना किंवा स्तन प्रत्यारोपणाद्वारे ते  परत मिळवता येतात. याबाबत महिलांमध्ये माहितीचा अभाव असल्याने टाटा रुग्णालय स्तन प्रत्यारोपणासंदर्भात जनजागृती करण्यावर भर देत आहे. रुग्णालयात स्तन प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे.

टाटा मेमोरियाल रुग्णालयामध्ये दरवर्षी १२ हजार रुग्णांवर स्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यातील मोजक्याच महिलांचे स्तन प्रत्यारोपण केले जाते. एका मोठय़ा लढाईनंतर महिलांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यात स्तनांचे प्रत्यारोपण महत्वाचे ठरते. टाटा रुग्णालयाच्या खारघरमधील रुग्णालयातील १४ आधुनिक शस्त्रक्रियागृहांपैकी एक स्तनाच्या कर्करोगासाठी आणि प्रत्यारोपणासाठी समर्पित केलेला आहे.

देशात स्तन कर्करुग्णांमध्ये वाढ होत आहे. स्तन प्रत्यारोपणाबाबत जागृती नसल्याने तुलनेने प्रत्यारोपणाचे प्रमाण कमी आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाने केवळ ७० स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या असल्याचे सुघटनशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विनय शंखधर यांनी सांगितले.  स्तन प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला चालना मिळावी, यासाठी खारघर येथे सुरू केलेल्या नवीन शस्त्रक्रियागृहांपैकी एक शस्त्रक्रियागृह हे सुघटन शल्य विभागाला देण्यात आले आहे. यामुळे स्तन प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल, असे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांचा प्रभावी वापर स्तनाच्या कर्करोगावरील उपचारादरम्यान अनेक महिलांना आपले स्तन कायमचे गमवावे लागतात. मात्र, या महिला वयाच्या कोणत्याही टप्प्यात स्तन पुन्हा मिळवू शकतात. याबाबत समाजमाध्यमावरून चित्रफितीच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्तन कर्करोगाने पीडित असलेल्या महिलांमध्ये स्तन प्रत्यारोपणाचे महत्त्व आणि आवश्यकता याची माहिती देण्यात येत असल्याचे सुघटनशल्य चिकित्सा विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सौम्या मॅथ्यूजने सांगितले.