सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून सावरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आजवर आपल्यापासून दूर राहिलेल्यांनाही त्यांनी आता आपलेसे करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या एमएसआरडीसीला थेट बिल्डर बनवून दादांनी या खात्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही आपल्या तंबूत सामावून घेत सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना चांगलाच धक्का दिला आहे.
छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर हे मराठवाडय़ातील बडे प्रस्थ आजवर छगन भुजबळ यांच्या सोबत तर अजित पवार यांच्यापासून चार हात लांबच असे. या राजकीय संबंधांमुळेच एमएसआरडीच्या अनेक प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधी मिळ्वितानाही क्षीरसागर यांची दमछाक होत असे. मात्र सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे उप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळ विजनवासात राहिलेल्या पवार यांनी पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होताच राष्ट्रवादीवरील आपली पकड अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षांतर्गत विरोधात असणाऱ्यांनाही त्यांनी आपलेसे करण्यास सुरुवात केल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे.
अजित पवार यांनी आज एमएसआरडीसीच्या विविध प्रश्नांवर जयदत्त क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. आर्थिक संकटात असलेल्या एमएसआरडीसीला सावरण्यासाठी त्यांचे वरळी-हाजी अली सागरी सेतू, पूर्व- पश्चिम सागरी वाहतूक हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची ग्वाही देत पवार यांनी क्षीरसागर आपल्या तंबूत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर विक्रीकर विभागाच्या तीन कार्यालयांचे बांधकाम करण्याचे काम देत त्यांनी एमएसआरडीसीला बिल्डरही बनविले. विक्रीकरच काय पण शासनाच्या कोणत्याही इमारतीची दुरुस्ती वा पुनर्बांधणी करण्याचे काम आजवर सार्वजनिक बांधकाम विभागास दिले जात असे. मात्र आपल्या अखत्यारीतील विक्रीकर विभागाच्या तीन कार्यालयांचे बांधकाम करण्याची काम पवार यांनी प्रथमच एमएसआरडीसीला दिले आहे. त्यानुसार पुण्यातील प्रशासकीय इमारत, कर्जत येथे प्रशिक्षण संस्था आणि माझगांव येथील प्रशासकीय कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार असून सुमारे ३०० कोटींचे हे काम एमएसआरडीसीला देत पवार यांनी छगन भुजबळ यांना धक्का दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
अजितदादांचा भुजबळांना धक्का
सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून सावरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आजवर आपल्यापासून दूर राहिलेल्यांनाही त्यांनी आता आपलेसे करण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 09-01-2013 at 03:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Set back for ajit pawar and bhujbal