मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा चालक पिंटू मिश्रा (३४) याला गुरुवारी वांद्रे न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. एका माजी अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीवर कामाचे आमिष दाखवून त्याने बलात्कार केला होता.
  पिंटू मिश्रा हा अभिनेता शाहरूख खानचा चालक आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी वांद्रे परिसरातील एका माजी अभिनेत्रीच्या घरी काम करते. ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आली होती. तिला चांगल्या पगाराच्या कामाची गरज होती. मिश्राला तिचा क्रमांक मिळाल्यानंतर त्याने तिला शाहरूखच्या बंगल्यात तसेच अन्य चांगल्या ठिकाणी काम देण्याचे आश्वासन दिले होते. २० जूनला त्याने तिला नालासोपारा येथील एक लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी त्याने तिला पुन्हा मुंबईला आणून सोडले. आम्हाला त्या हॉटेलचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले असून वैद्यकीय अहवालही मिळाला असल्याचे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र ढवळे यांनी सांगितले. दरम्यान या पीडितेचे वय १७ नसून २३ असल्याचे तिच्या आधार कार्डावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपीवर बाल लैंगिक शोषण कायद्याचे (पोक्सो) कलम लावण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.