मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मनी लॉडरिंग प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्याला तीव्र विरोध केला होता. हा कायदा अत्यंत घातक आहे, राज्य बदलले की या कायद्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागेल असे मी त्या वेळी निदर्शनास आणून दिले होते. पण माझे ऐकले गेले नाही. सत्ताबदल झाल्यावर त्याचा पहिला फटका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना बसला. विरोधकांना उद्ध्वस्त करणाऱ्या कायद्यातील कठोर तरतूद रद्द केली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर तुरुंगातील दिवसांच्या अनुभवावर ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत पार पडला.
केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी केला. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासात संजय राऊत यांचा संबंध नसताना त्यांना गुंतवले गेले. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आलेले ५८ कोटी रुपये प्रकरणांची माहिती राऊत यांनी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना दिली. त्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्यासंबंधी कारवाई होत नव्हती. राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे आम्हाला स्थिती कळली. ती स्थिती दुरुस्त करण्याचा विचार आज ना उद्या करावा लागेल. एकनाथ ़खडसे यांच्या जावयालाही अशाच प्रकारे अटक करण्यात आली होती, असेही पवार यांनी सांगितले.
‘विरोधकांना तुरुंगात डांबणे चूक’
विरोधकांना तुरुंगात टाकून सरकार चूक करीत आहे. तुरुंगात गेल्यानंतर विरोधक विचार करतात आणि ते सरकारला त्रासदायक ठरते. तुरुंगात आतापर्यंत महान साहित्य निर्माण झाले आहे. राऊत यांनी तुरुंगाबाहेरही लिहीत राहावे असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. मला नेहमीच दोन्ही बाजूंकडून दोष दिला जातो. काहीजण मला पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला देतात त्या वेळी पाकिस्तान अथवा नरक निवडण्याची वेळ आल्यास मी नरक निवडेन पण पाकिस्तान नाही असे अख्तर यांनी स्पष्ट केले.
‘सरकार घालवावे लागेल’
सरकारे येतात आणि जातात. हे सरकारही उद्या जाणार आहे. या सरकारने स्वर्गासारख्या भारत देशाचा नरक केला आहे. त्याचा पुन्हा स्वर्ग बनवायचा असेल तर हे सरकार आपल्याला घालवावेच लागेल. त्यासाठी लढणारी नवीन पिढी तयार करावी लागेल. हुकूमशहा कोणीही असला तरी त्याला एक दिवस जावेच लागते, असे परखड मतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अन्यायाशी लढणारी पिढी उभी राहील, अशा लढाया यापुढेही लढाव्या लागतील असे त्यांनी नमूद केले. तुम्ही आम्हाला पाकिस्तानपेक्षा आधी संपवायचे का बघत आहात, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. अमित शहा कधी मातोश्रीवर आले होते का असे कोणी विचारले तर आपण नाही आठवत असे सांगणार आहे. केलेले उपकार मोजायचे नसतात ते करायचे असतात अशी आम्हाला शिकवण आहे असे ठाकरे यांनी सांगितले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मी मनी लॉडरिंग प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्याला तीव्र विरोध केला होता. सध्या सत्तेचा गैरवापर सुरु असून, केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत आहे. –शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</p>