नाटकाचा आशय आणि विषय महत्वाचा आहे. चांगली दर्जेदार कलाकृती असेल तर मराठी प्रेक्षक नक्कीच त्या नाटकाच्या पाठिशी उभा राहिल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९८ व्या अखिल भारतीय नाटयसंमेलनाच्या उद्धाटन सोहळयात बोलताना सांगितले.
मोगले आझमचे प्रयोग मी स्वत: दोन ते तीन वेळा पाहिले आहेत असे पवार म्हणाले. मी बारामतीमध्ये तीन नाटयगृह बांधली. ती तिन्ही नाटयगृह जाऊन पाहा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात अशी नाटयगृह असल्यास नाटयगृहाचे जे प्रश्न, समस्या आहेत त्या सुटतील असे शरद पवार म्हणाले.
नाटय निर्मिती करताना सतत नावीन्याचा ध्यास, नवीन दृष्टीकोन असला पाहिजे असे पवार म्हणाले. सतत नावीन्यांचा ध्यास असेल तर मराठी नाटकाला उज्वल भवितव्य आहे असे शरद पवार म्हणाले. आजची बालरंगभूमी उद्याची प्रायोगिक रंगभूमी आहे आणि प्रोयोगिक रंगभूमी उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे त्यामुळे बालरंगभूमीपासूनच नाटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे पवार म्हणाले.
नाटकांच्या सादरीकरणात भव्यता असेल तरच नाटकांना रसिकांचा प्रतिसाद मिळेल असे शरद पवार म्हणाले. अनेक कलाकारांची उतारवयात परवड होते. ती थांबवण्यासाठी नाट्य परिषदेने आणखी प्रयत्न करावेत असे पवार म्हणाले. सतिश आळेकरांनी मराठी नाटकांना नवी उंची दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत नाटयव्यवसायातील उणीवांवर बोट ठेवले. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला चित्रपटाचं वेड नाही. त्याला नाटकांच वेड आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे असे मुलुंड येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. नाटक भरपूर येत आहेत पण ती चालतात किती हे महत्वाच आहे असे राज म्हणाले. नाटय निर्मिती करुन पोट भरण चांगल पण काही जण तारखा विकण्यासाठी नाटक कंपन्या काढतात हे दुर्देव आहे असे राज ठाकरे म्हणाले.