राज्यात एकाच वेळी दोन निवडणुका चर्चेत आहेत. एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाची निवडणूक. अंधेरीत भाजपा-शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत दिसली. मात्र, एमसीए निवडणुकीत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले दिसले. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनाच विचारण्यात आलं. यावेळी पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) सिल्वर ओक या आपल्या मुंबईतील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची चर्चा करण्याचं कारण काय हे मला समजत नाही. मी याआधी एमसीए आणि बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. याशिवाय आयसीसीचाही अध्यक्ष होतो. माझ्याबरोबर सर्व पक्षाची लोक काम करत होते.”
“तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ होते”
“मी जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ होते. ते माझ्या बैठकींनाही हजर राहायचे. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचा पक्ष आणि माझा पक्ष सर्वांना ठाऊक आहे. खेळात आम्ही कोणीही कधीही राजकारण आणत नाही, राजकीय भूमिका घेत नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“मी मागे एकदा विलासराव देशमुखांना उभं केलं होतं”
शरद पवार पुढे म्हणाले, “एमसीए निवडणुकीत आमचा पॅनल दरवेळी असतो. मागच्या वेळीही आमचा पॅनल होता. मी मागे एकदा विलासराव देशमुखांना उभं केलं होतं. आशिष शेलारांना याआधी अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. खेळात हे होत असतं. खेळात मी पक्ष आणत नाही.”
“एमसीएचे सर्व सदस्य खेळात कधीही राजकारण आणत नाहीत”
“मुंबई क्रिकेट असोसिएशन ही चांगली संघटना आहे. एमसीए देशातील प्रभावी राज्य संघटना आहे. एमसीएचे सर्व ४००-५०० सदस्य तेथे कधीही राजकारण आणत नाहीत,” असंही पवारांनी नमूद केलं.
“…तर निवडणूक आयोगाच्या कामाबाबत शंका घेतल्या गेल्या नसत्या”
निवडणूक आयोगावर बोलताना शरद पवार म्हणाले, “हिमाचल प्रदेशची निवडणूक लागली पण गुजरातची निवडणूक लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करताना निवडणूक आयोगाने सगळ्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगाच्या कामाबाबत ज्या शंका घेतल्या जातात. त्या शंका घेतल्या गेल्या नसत्या.”
“निवडणूक आयोग ही स्वतंत्र मताची संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत कोणती शंका उपस्थित होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. तशी जबाबदारी निवडणूक आयोग व प्रशासनाची सुद्धा आहे,” हेही शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.