मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून उपराष्ट्रपती पदासाठी भाजप आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी ते आमच्या विचाराचे नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात आली होती याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकमताने बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारी अर्ज ही दाखल केला आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरध्वनी करून पाठिंब्याची विनंती केली असता मी त्यांना पाठिंबा देणे शक्यच नसल्याचे स्पष्ट केले. आमचा पाठिंबा हा इंडिया आघाडीला आहे. राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत, ते झारखंड राज्याचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते. त्यावेळी राजभवनात सक्तवसूली संचनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. राज्यपालांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. सोरेन यांनी राजभवनात अटक न करता ती, रस्त्यावर, स्वतःच्या कार्यालयात किंवा घरी अटक करावी, अशी विनंती केली होती. तरीही त्यांना राजभवनात अटक झाली. राजभवनात अटक करण्यास राधाकृष्णन यांनी विरोध करायला हवा होता. सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो, याचे हे उदाहरण आहे, अशा लोकांना मतदान करणे योग्य वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी राधाकृष्णन यांना मतदान करण्यास स्पष्ट नकार दिला.
बिहारमध्ये राहुल गांधी यांना मोठा प्रतिसाद
निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कामांना आम्ही विरोध केला आहे. त्या विरोधात दिल्ली येथे ३०० खासदार रस्त्यावर उतरले होते. तिथे आम्हाला अटक करण्यात आली. बिहारमध्ये निवडणूक आयोगाचे जे काम चालले आहे, त्याला लोकांचा विरोध आहे. सध्या बिहारमध्ये राहुल गांधी दौरे करीत आहेत, त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बिहार राज्य आर्थिक अडचणीत असले, तरीही ते राजकीय दृष्ट्या जागृत राज्य आहे. महात्मा गांधी यांनी ही बिहारमध्येच चंपारण्य सत्याग्रह केला होता. कर्पुरी ठाकूर यांच्या मागे बिहारची जनता उभी राहिली. लोकांचा विरोध असतानाही निवडणूक आयोग योग्य भूमिका घेत नाही. त्यामुळे देशभर आयोगाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध केला जाईल, असेही पवार म्हणाले.
शिरूर मतदारसंघात २७ हजार बोगस मतदान
विधानसभा निवडणुकीत शिरुर (जि. पुणे) येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार अशोक पवार यांचा पराभव झाला होता, त्यांना पवारांच्या उपस्थितीत शिरूर मतदारसंघातील अनियमितता मांडली. केसनंद या गावात घर क्रमांक एकमध्ये १८८ मतदारांची नोंद आहे. या घराची नोंद २०१५ मध्ये रद्द झाली आहे. तरीही मुस्लिम, हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या अडनावाची १८८ मतदार एकाच घरात असल्याचे दिसून आले आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत ४९,८३७ मतदार वाढले, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी सहा महिन्यांत ३२,३१९ मतदार वाढले आहेत. ही मतदारांची वाढ संशयास्पद आहे. बाहेरच्या तालुक्यांतून मतदारसंघात १७,४४२ मतदारांची नावे शिरूर मतदारसंघात आली आहेत. ही नावे त्यांच्या – त्यांच्या ही मतदारसंघातही आहेत. फोटो, वय, नावे, घर क्रमांक बदलून दुबार काही मतदारांची नावे पाच – पाच वेळा समावेश करण्यात आली आहेत. अनेक मतदारांचे घर क्रमांक शून्य आहे. दुबार मतदारांना मतदान करणे सोयीचे होण्यासाठी मतदान केंद्र क्रमांकही वेगवेगळे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत मतदार संघात एकूण २७,००० नावे दुबार आहेत. मतदार संघातील अन्य मतदार याद्यांची तपासणी सुरू आहे.
हडपसरमध्ये ४३,००० मतदारांचे चुकीच्या पद्धतीने मतदान
हडपसर विधानसभा मतदार संघातून मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना १५,५०० हजार मतांचीआघाडी मिळाली होती. जून २०२४ ते सप्टेंबर २०२४ मध्ये ४०,३०० नावांची मतदार यादीत नव्याने नोंदणी विरोधी उमेदवाराने केली. मतदारसंघात एकूण ४९,००० मतदारांचा घोळ आहे. ४३,००० मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केले आहे. १७ अ या फॉर्ममध्ये मतदान कोणी केले, किती वेळा केले यांची माहिती असते, ती माहिती राज्य निवडणूक द्यायला तयार नाही. विरोध पक्षाच्या उमेदवाराने कोणत्या एजन्सीमार्फत हा घोळ केला. त्या एजन्सीला किती आणि कसे पैसे दिले, याची माहिती उच्च न्यायालयासमोर ठेवणार आहे, असेही प्रशांत जगताप म्हणाले.
खडकवासला मतदारसंघात मतदान यंत्राच्या माध्यमातून झालेल्या मतचोरीचा प्रकार माध्यमासमोर मांडण्यात आला. सलग दुसऱ्यांदा तुतारी चिन्हावर मतदान केल्यास व्हीव्हीपॅट नोंद मिळत नसल्याची चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच पुढील १५ दिवसांत राज्यातील सर्व मत चोऱ्या उघडकीस आणणार आहोत, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.