मुंबई : महाराष्ट्रातील लोकांना सत्तेचा उन्माद पसंत नाही, हेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी भाजप-शिवसेनेवर प्रहार केला.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. काँग्रेस व मित्र पक्षांबरोबर बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविली जाईल, असे पवार यांनी सांगितले. निवडणुकीतील एकूण कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, प्रथम त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. विरोधक कुठे दिसतच नाहीत, २२० च्या वर आम्ही जागा जिंकू असा दावा करणाऱ्या भाजप-शिवसेना नेत्यांचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारला आहे, असे ते म्हणाले.
ज्यांनी पक्षांतर केले, त्यांना लोकांनी नाकारले, हेही या निवडणूक निकालातून दिसून आले. सातारा ही लोकसभेची एकच जागा होती. त्याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. सातारच्या गादीबद्दल सर्वाना आदर होता, परंतु त्या गादीशी इमान ठेवले नाही तर काय होते हे लोकांनी दाखवून दिले, अशी टीका त्यांनी भाजपचे पराभूत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर केली. आमचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना जनतेने चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल मी स्वत तेथे जाऊन सातारकर जनतेचे आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत दिसले की, लोकांना सत्तेचा उन्माद पसंद पडला नाही. २२० चा आकडा पार करू असे सांगितले जात होते, मात्र लोकांनी ते स्वीकारले नाही. सत्ता येते-जाते, पण मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की जनतेकडून स्वागत होते. मात्र त्यांनी सीमा ओलांडली होती.
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा
