मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू करण्यात आली होती. या शिष्यवृत्तीचे यंदाचे पाचवे वर्ष असून, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी सुरू आहे.

कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत करणे हा शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे.

कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर १५ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. अर्ज १२ ऑक्टोबर २०२५ नंतर स्वीकारले जाणार नाहीत. आलेल्या सर्व प्रस्तावांची १३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत काळजीपूर्वक तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ४०, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ साठी १२ अशा तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण ८२ जणांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांची घोषणा १ डिसेंबर रोजी शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावर केली जाईल. १४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे निवड झालेल्या शिष्यवृत्ती धारकांना सन्मानपूर्वक शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठीचे व्यासपीठ

या वर्षी कृषी फेलोशिपमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित काम करणाऱ्या स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी विशेष संधी निर्माण करण्यात येणार आहे. जे शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असतील, अशा प्रत्येक तरुणांनी या स्पर्धेत नक्की सहभागी व्हावे. कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत तरुणांना आपली कल्पकता आणि कौशल्य दाखविण्याची ही सुवर्णसंधी आहे. ही फेलोशिप केवळ आर्थिक मदत किंवा सन्मान नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुणांना मिळालेले एक सामर्थ्यशाली व्यासपीठ आहे. तुमच्या कल्पना, तुमची ऊर्जा आणि तुमचे स्वप्न या नवपरिवर्तनाच्या प्रवासात सामील करा, असे आवाहन ही सुळे यांनी केले आहे.