मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळी सारखा इतिहास निर्माण करणारा मोर्चा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही असेच लाखोंचे मोर्चे निघत होते. आज मोर्चातून मनसेसह महाआघाडीच्या घटक पक्षांनी मोठी एकजूट दाखविली आहे. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार आणि लोकशाही वाचविण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या. पडेल ती किंमत मोजू, पण मताचा अधिकार आणि लोकशाही टिकवू, असा निर्धार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

आम्ही स्वताःसाठी काही मागत नाही. लोकशाहीमध्ये राज्यघटनेने जो अधिकार दिला आहे, त्याचे जतन करण्याची गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सामान्य माणसांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे. मतदार अस्वस्थ झाले आहेत. आमदार उत्तमराव जानकर यांनी मत चोरीचा अनुभव सांगितला. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. आपल्यात राजकीय मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्ष ही होईल. पण, राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार जपण्याचा निर्धार आपण केला पाहिजे, असे पवार म्हणाले.

तक्रार करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल

राज्यात बनावट आधारकार्ड मिळतात, त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, त्यांना प्रत्यक्षिक दाखविले. पण, ज्याने तक्रार केली, प्रत्यक्षिक दाखविले त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. सत्य समोर आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. काहीही करा पण, मतांची चोरी थांबवा. आपले राजकीय पक्ष वेगळे आहेत, विचारधारा वेगळी आहे. मतभेद आहेत. पण, मताचा अधिकार टिकविण्यासाठी एकत्र यावे लागेल. पडेल ती किंमत मोजू पण, मताचा अधिकार, राज्यघटना आणि लोकशाही टिकवू, असा निर्धार शरद पवार यांनी केला.

काय होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ?

संयुक्त महाराष्ट्र चळवळ मराठी भाषिक लोकांना एकत्र करून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी झालेला एक मोठा लढा होता. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या चळवळीत सुमारे १०६ हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे मराठी माणसांसाठी हा अत्यंत भावनिक मुद्दा आहे. १९५६ ते १९६० या काळात ही चळवळ अधिक तीव्र होती. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, केशवराव जेधे, नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे आणि सेनापती बापट यांच्या सारख्या अनेक मराठी नेत्यांनी चळवळ उभारली होती. ही चळवळ जात, धर्म आणि राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन लोकांनी एकत्र येऊन जिंकलेल्या लढ्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी मनसेसह महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चांची तुलना करून हा विषय भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.