Shashank Rao on BEST Credit Society Election Results : बेस्टच्या (BEST) पतपेढीच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर आला असून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर, भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे बंधुंच्या (राज व उद्धव ठाकरे) पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीवर राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे. या विजयानंतर राव यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार त्यांना नाकारतात.”

शशांक राव म्हणाले, “शिवसेना (उबाठा) बेस्टमध्ये कामगारविरोधी आणि खासगीकरणाचं धोरण चालवत आली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कामगारांनी शिवसेनेच्या (उबाठा) धोरणाविरोधात आपलं मत नोंदवलं आहे. आमचा लढा आम्ही जिंकला आहे. बेस्टची जी दशा झाली आहे त्या दशेला शिवसेना (उबाठा) व त्यांची बेस्ट कामगार युनियन जबाबदार आहे. बेस्ट कामगार युनियन कमिटीत असताना त्यांनी बेस्टचं मोठं नुकसान केलं. आम्ही कामगार अनेक वर्षे कामगारांचा लढा देत आहोत. तोच मुद्दा आम्ही कामगारापर्यंत नेला आणि कामगारांनी आमच्या बाजूने मत नोंदवलं.”

शशांक राव नेमकं काय म्हणाले?

कामगार नेते राव म्हणाले, “शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती आम्हाला आव्हान वाटत नव्हती. कारण दोन भाऊ एकत्र आले किंवा नाही हा प्रश्नच नव्हता. तुम्ही कामगारांसाठी काम केलं तर तुम्ही एकटे असाल तरी कामगार तुम्हाला निवडून देतात आणि कामगारांनी नेमकं तेच करून दाखवलं. आमच्या एवढ्या वर्षांच्या लढाईला यश मिळालं.”

“आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नसते. ही 19१९४६ पासूनची संघटना आहे. जॉर्ज फर्नांडिस हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष होते. अनेक कामगार नेते आमचे सहकारी राहिले आहेत. कामगारांची कामगारांसाठी काम करणारी संघटना म्हणजे आमची संघटना. मी भाजपात असलो, भाजपाचे विचार मनात असलो तरी आम्ही प्रामुख्याने कामगारांसाठी काम करतो आणि पक्षांकडून जी काही मदत मिळते ती घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांची नेहमीच मदत केली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा देखील आम्हाला मदत करत होते. आम्हाला भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील मदत केली. कामगारांना ग्रॅच्युइटी मिळत नव्हती तेव्हा शेलार यांनी कामगारांची मदत केली. त्याच कामाची निवडणुकीतून पोचपावती मिळाली आहे.”

शशांक राव यांचा ठाकरे बंधूंना चिमटा

शशांक राव म्हणाले, “आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम केलं. त्यामुळे मला वाटतं की कोणीही एकत्र आलं तरी कामगारांसाठी केलेलं काम कामगार विसरत नाहीत. कोणी कितीही लोक एकत्र आले तरी त्यांनी जर कामगारांसाठी काम केलं नाही, कामगारांचे हित बघितलं नाही तर त्यांच्या वाटेला असेच भोपळे येत राहणार.”