मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणी वगळण्यात आलेल्या ६५ साक्षीदारांच्या नावांची यादी सीबीआयतर्फे गुरूवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आली. त्यात शीनाची आई आणि प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा तिसरा पती पीटर मुखर्जी याची पहिली पत्नी शबनम सिंग हिच्या नावाचा समावेश आहे. पीटर हा या प्रकरणी सहआरोपी असून जामिनावर बाहेर आहे.

गेल्या मार्चमध्ये, सीबीआयने १२५ साक्षीदारांची अंतिम यादी विशेष न्यायालयात सादर केली होती. त्यात इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांची मुलगी विधी मुखर्जी हिचा समावेश होता. संजीव खन्ना देखील या प्रकरणी सहआरोपी आहे. विधीसह या यादीत तपासात सहभागी असलेले पोलिस अधिकारी, शीनाचे मित्र संजना फुकन रक्तिम आणि प्रणमी गोस्वामी यांचा समावेश होता.

तथापि, साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ साक्षीदारांच्या नावांची यादी सीबीआयने गुरूवारी विशेष न्यायालयात सादर केली. त्यात पीटर याच्या पहिल्या पत्नीचा, शबनम सिंग हिच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, शीना बोरा हत्याकाडांशी संबंधित खटल्याची सध्या दररोज सुनावणी सुरू असून साक्षीदार तपासले जात आहेत.

प्रकरण काय ?

शीना (२४) हिला इंद्राणी आणि संजीव खन्ना यांनी एप्रिल २०१२ मध्ये रायगडजवळील एका जंगलात नेले. तेथे त्या दोघांनी इंद्राणीचा माजी चालक श्यामवर राय याच्या साथीने शीनाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, शीनाचा मृतदेह जाळून तो जंगलातच फेकून देण्यात आला, असे आरोप सीबीआयने केले आहेत. या प्रकरणानंतर तीन वर्षांनी शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली राय याला अटक झाली. त्यावेळी, चौकशीदरम्यान शीना हिचे हत्याकांड उघडकीस आले. त्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणी आणि खन्ना यांना अटक करण्यात आली होती, तर पीटर याला तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी जामिनावर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शीना जिवंत असल्याचा दावा इंद्राणीने खटल्यादरम्यान वेळोवेळी केला आहे. तसेच, सीबीआयला तिचा शोध घेण्याचे आदेश देण्याची मागणीही इंद्राणीने विशेष न्यायालयाकडे केली होती. तथापि, न्यायवैद्यक पुराव्यांवरून रायगड येथील जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा हा शीना हिचाच असल्याचा दावा सीबीआयने केला. तसेच, इंद्राणी हिची मागणी फेटाळण्याची मागणी केली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर इंद्राणीने परदेशी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तिला परदेशी जाण्यास परवानगी दिल्यास ती पुन्हा कधीच भारतात परतणार नाही, अशी भीती सीबीआयने व्यक्त केल्यावर उच्च न्यायालयाने इंद्राणीच्या परदेशवारीला नकार दिला होता.