Sheena Bora : शीना बोरा हत्याकांड हे साधारण १३ वर्षांपूर्वीचं गाजलेलं हत्याकांड आहे. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना या दोघांना शिक्षाही झाली होती. दरम्यान या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे कारण इंद्राणीची मुलगी आणि या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांपैकी एक असलेल्या विधी मुखर्जीने चकित करणारा दावा केला आहे. विधीचं म्हणणं आहे की सीबीआयने तिच्या नावे दाखल केलेला जबाब हा बनावट आहे. विधीने सीबीआयवरच आरोप केल्याने आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

विधी मुखर्जीने नेमकं काय म्हटलं आहे?

सीबीआयने शीना बोरा प्रकरणात माझा जबाब म्हणून जे काही कोर्टात सादर केलं ते बनावट आणि खोटं आहे. असं करण्यामागे सीबीआयचा नक्कीच चुकीचा हेतू असणार हे उघड आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात जेव्हा माझी चौकशी पोलीस करत होते तेव्हा मी कधीही एकटी नव्हते. माझ्यासह माझे सावत्र वडील पीटर मुखर्जी किंवा बहीण शंगोन दास गुप्ता अथाव रॉबिन मुखर्जी यांच्यापैकी कुणी ना कुणी तरी होतं.

सीबीआयने कोऱ्या कागदांवर सह्या करुन घेतल्या-विधी

सीबीआयने कोऱ्या कागदावर आणि ई-मेलच्या कॉपींवर सह्या करून घेतल्याचा विधी मुखर्जीने कोर्टात दावा केला आहे. हीच कागदपत्रं नंतर जबाब म्हणून सीबीआयने सादर केली असल्याचे विधी मुखर्जीचं म्हणणं आहे. अशाप्रकारे तिच्या नावे खोटे जबाब आरोपपत्रात घालणं, म्हणजे कोणालातरी खोटं फसवण्याचा डाव असल्याचा आरोपही विधी मुखर्जीने केला आहे. तर आई इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही विधी मुखर्जीने आरोप केला आहे. तर आईच्या अटकेनंतर विधीचे कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि बँकेतील सात कोटी रुपये चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप विधीने केला आहे. तसेच शीना स्वतःला इंद्राणीची बहीण म्हणून दाखवत असल्याचा देखील विधी मुखर्जीचे म्हणणे आहे. इंद्राणी मुखर्जीवर आपली मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप असून सध्या इंद्राणी मुखर्जी जामीनावर बाहेर आहे.

शीना बोरा हत्या प्रकरण काय आहे?

शीना बोरा हत्या प्रकरण प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं २५ एप्रिल २०१२ रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. हे प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आलं होतं.