मुंबई : अंधेरी (पूर्व) च्या विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असून भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर शिंदे गट दावा करीत आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे.

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे शिवसेनेची ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी, असे काही नेत्यांना वाटत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक लढवू नये, असाही एक मतप्रवाह शिंदे गटामध्ये आहे. मात्र भाजपने काही काळापासून ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून मुरजी पटेल यांनी कामही सुरू केले आहे.