महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात रणकंदन सुरु आहे. अशात भाजपा नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून टीकास्त्र सोडलं जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून घणाघात केला आहे. “मुंबईच्या एका मंत्र्याने आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. आग्र्यातून सुटताना शिवाजी महाराजांना भाजपाने मदत केली होती का? जशी या गद्दारांना भाजपाने केली. ही गद्दारी आहे,” असा हल्लाबोलही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केला.

“आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं नसतं, तर हे तुलना करणारे, कुठेतरी कुर्निसात करत उभे राहिले असते,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबईतील वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असं वादग्रस्त विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलं.