मुंबई : दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई व ठाणे परिसरातील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी शनिवार, १६ ऑगस्ट रोजी नागरिकांची गर्दी उसळणार आहे. या धामधुमीत परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेशही दिले जातात. या अनुषंगाने यंदा मालाड (पूर्व) परिसरातील शिवसागर गोविंदा पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे.
दरवर्षी शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले जाते. सद्यस्थिती मांडून विविध सामाजिक विषयांवरही भाष्य करणारे, ऐतिहासिक प्रसंगांवरील देखावे सादर केले जातात. या गोविंदा पथकाने गेल्या काही वर्षात सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे योगदान समजण्यासाठी ‘गड आला पण सिंह गेला’, महिला सबलीकरण आणि अफजलखानाचा वध हा देखावा तीन थर रचून चौथ्या थरावर सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या अनुषंगाने आजच्या पिढीला आणि विशेषतः शालेय व महाविद्यालयांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी यंदा शिवसागर गोविंदा पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास व विविध प्रसंग कशाप्रकारे दाखविले जाणार, यासंदर्भातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘दरवर्षी उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मानवी मनोरा रचनेत देखावा सादर करून सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा तीन थर रचून चौथ्या थरावर दाखविणार आहोत. हा देखावा माझ्यासह किशोर कदम, संदीप कोळप आदी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सादर करीत आहोत. आमच्या गोविंदा पथकात ३५० जण असून गेल्या दीड महिन्यापासून सराव सुरू आहे’, असे शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बबन बोभाटे यांनी सांगितले.