मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेची जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्यानी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्यानंतरही माफी मागितल्याशिवाय राणा दांपत्याला बाहेर जाता येणार नाही असा इशारा दिला आहे. परिवहन मंत्री आणि शिवसनेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे कारण सांगून राणा दांपत्य पळ काढत आहे. आव्हानाची भाषा करत ते मुंबईत आले होते आणि आता घरात लपून बसले आहेत. त्यामुळे त्यांनी ज्यापद्धतीने मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांनी बाहेर पडू नयू अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. हिंदुत्वाचे धडे राणा दांपत्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही. आम्हाला घंटा बडवणारे हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारे हिंदू हवे आहेत हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे. हे राजकीय अतिरेकी आहेत त्यामुळे आमचे शिवसैनिक देखील गदाधारी शिवसैनिक आहेत,” असे मंत्री अनिल परब म्हणाले.

“मुंबईत १९९२ च्या दंगली झाल्या त्यावेळी हे राणा दांपत्य कुठे होते त्याचा त्यांनी अभ्यास करावा. यांच्याकडून हिंदुत्व शिकण्याची वेळ शिवसेनेवर आलेली नाही. मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत. शिवसैनिकांनी आतापर्यंत कोणताही कायदा हातात घेतलेला नाही. जोपर्यंत ते माफी मागत नाही किंवा पोलीस त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही तोपर्यंत शिवसैनिक तिथून हलणार नाही,” असा इशारा अनिल परब यांनी दिला.

“मोहित कंभोज यांना गाडीमधून तिथे येऊन शिवसैनिकांना डिवचण्याचे काही कारण नव्हते. जाणूनबुजून शिवसैनिकांना चिथावणी देण्याचे काम कोणी करत असेल तर राग व्यक्त होणे साहजिक आहे,” असे अनिल परब म्हणाले.

दरम्यान, २३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा दांपत्यानं जाहीर केलं होतं. मात्र, आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दांपत्यानं आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.“राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रवी राणा यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainik will not move unless rana couple apologizes anil parab abn
First published on: 23-04-2022 at 16:26 IST