सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या लेखी ग्वाहीशिवाय सत्तेत सहभागी होणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेने लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या ५०-५० सूत्राचा आग्रह शनिवारी धरला. शिवसेनेला ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळणार नसेल, तर अन्य पर्याय खुले आहेत, पण ते पाप मला करायचे नाही, असा गर्भित इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत सत्तेत समान वाटा आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सत्तेचे वाटप व्हावे आणि तसे भाजपने लेखी द्यावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकार स्थापनेतील तिढा आणि भाजपची चिंता वाढल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ‘मातोश्री’वर शनिवारी झाली. सत्ता स्थापण्यासाठी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. भाजप नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहितीही ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते. निवडणुकीत समान जागावाटप आणि सत्तेत सम-समान वाटा हे सूत्र शहा आणि फडणवीस यांनीही मान्य केले होते. मुख्यमंत्रिपदाबाबतही आपण त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
निवडणूक जागावाटपात शिवसेनेने कमी जागा स्वीकारल्या, कारण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. शहा आणि फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतील सूत्रानुसारच सत्तेचे वाटप झाले पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. ‘‘जे ठरले आहे, त्यापेक्षा मला कणभरही अधिक नको. सत्तेच्या वाटपाबाबत भाजपने लेखी स्वरूपात देणे अपेक्षित आहे’’, असे ठाकरे यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजप-शिवसेना युती अभेद्य आहे. मात्र ठरलेल्या सूत्रानुसार सत्तावाटप झाले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
भाजपकडून लेखी प्रस्ताव आल्याशिवाय सत्ता स्थापनेबाबत शिवसेना कोणताही निर्णय घेणार नाही, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. सत्तावाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसारच निर्णय व्हावा, अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी काही आमदारांनी बैठकीत केली. त्याचबरोबर चांगली खाती मिळावीत, असाच शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या एकूण पवित्र्यावरून स्पष्ट होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांच्या या पहिल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड मात्र करण्यात आली नाही.
भाजपविरोधात तक्रारींचा पाढा
विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक मतदारसंघांमध्ये अपशकुन केला या आणि अशा अनेक तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या आमदारांनी वाचला. आपल्या मतदारसंघात भाजपने कसे शिवसेनेच्या विरोधात काम केले, याची उदाहरणेही काही आमदारांनी दिली. भाजपने काही ठिकाणी बंडखोरांना फूस लावली, असाही आरोप करण्यात आला. भाजपच्या विरोधात शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही बाब भाजपच्या वरिष्ठांच्या कानावर घालण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
.. तर अन्य पर्याय खुले!
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपशी असलेली युती अभेद्य आहे. परंतु ठरल्यानुसार शिवसेनेला सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळणे आवश्यक आहे. ते मिळणार नसेल तर शिवसेनेपुढे अन्य पर्याय खुले आहेत. परंतु, ते पाप मी करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केले. कमी जागा मिळवूनही शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेत्यांना आता उपमुख्यमंत्रिपदावर आपल्या मित्रपक्षाची बोळवण करता येणार नाही.