फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिका आयुक्तांना दिल्यामुळे स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत शिवसेना, भाजप आणि मनसे विरुद्ध काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. कारवाईस गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यास संजय निरुपम यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना, भाजपकडून करण्यात आली.
मुंबईमध्ये सरसकट सर्वच फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये उपस्थित केला. कारवाई थांबविण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेना, भाजपा आणि मनसेच्या नगरसेवकांनी आंबेरकर यांच्या मागणीला विरोध केला. कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास संजय निरुपम यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर आणि भाजप गटनेते मनोज कोटक यांनी केली. निरुपम यांनी कारवाईसाठी येणाऱ्या पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, शिव वडापावच्या गाडय़ांवरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला. ठिकठिकाणी शिव वडापावच्या अनधिकृत गाडय़ा उभ्या आहेत. मग केवळ फेरीवाल्यांविरुद्धच कारवाई का, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी शिवसेनेला डिवचले. शिवसेनेने ७० हजार रुपये घेऊन मराठी बेरोजगारांना या गाडय़ा दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2015 रोजी प्रकाशित
निरुपम यांच्या धमकीचे पालिकेत पडसाद
फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिका आयुक्तांना दिल्यामुळे स्थायी

First published on: 16-07-2015 at 12:18 IST
TOPICSसंजय निरुपम
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp demand to file case against sanjay nirupam for threatening bmc commissioner