मुख्यमंत्री पदाचे प्रत्येकी अडीच वर्षे समसमान वाटप करावे ही मागणी लावून धरणाऱ्या शिवसेनेला भाजपमधील दिल्लीतील एका गटाची फूस असल्याची चर्चा आहे. शिवसेनेनेही पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी दिवसभर नवी दिल्लीत होते. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा, पक्षाचे राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतरही सरकार स्थापनेचा तिढा सुटला नव्हता. भाजपमधील नवी दिल्लीतील एक गट शिवसेनेला मुख्यमंत्री पदावरून भरीस घालत असल्याचे समजते. अर्थात, अस्तनीतील निखारे कोण, अशी चर्चा यातूनच सुरू झाली.

अडीच वर्षे मुख्यमंत्री समसमान वाटून घ्यावे ही शिवसेनेची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा झाली तेव्हा अमित शहा यांच्या उपस्थितीत या सूत्रावर चर्चा झाली होती, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे म्हणणे आहे. हाच मुद्दा पकडून भाजपमधील एका गटाने शिवसेनेला फूस देत फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.