मुंबई: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, तर अशी माणसे अत्यंत विकृत व हिणकस वृत्तीची आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित विजयी मेळावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावर बोतलाना उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आल्यामुळे या लोकांच्या बुडाला आग लागणे स्वाभाविकच आहे. कारण, भाजपचे राजकारणच तोडा, फोडा व राज्य करा यावर अवलंबून आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या व त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हाच भाजपचा धंदा आहे. हा धंदा आता संपला आहे. त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागल्याचे मी समजू शकतो.
काही तरस आहेत. जे गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काहीही बोलावे. त्यांना इथे कुणीही ओळखत नाही. मी त्यांना तरस या प्राण्याची उपमा दिली. पण हे लोक त्याही लायकीचे नाहीत. काड्या करणे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांनी इकडे येऊन पाहावे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही उगीच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहतात. शिवसेना व शिवसैनिक रक्तदान, रुग्णवाहिका आदी सर्वच सेवा कोणतीही जात-पात धर्म न पाहता पुरवतात. त्यामुळे या बाहेरच्या लोकांनी स्वतःचे घर पाहावे. स्वतःचा पक्ष जो मेलेला आहे, तो जिवंत होतो का हे पहावे.
यावेळी मंत्री आशीष शेलार यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टिपणी केली. भाजप आमदार आशिष शेलार मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना पहलगाम हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी करत आहेत. अतिरेक्यांशी करणारे लोक मराठी व महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी लोकांनी आता ओळखले पाहिजे. त्यांनी हा विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का? हे त्यांनी सांगावे. जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या घरात हे अतिरेकी राहत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. एकतर तुम्ही हिंदूंना वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेता. हे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने राज्यकर्ते झाले, अशी टीका त्यांनी केली.
देशभरातील उरबडवे भाजपमध्ये
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला फडणवीसांनी रुदाली म्हटल्याच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. फडणवीसांची मानसिकता समजू शकतो. कारण मूळ भाजप पक्ष मेला आहे. या लोकांनी हा खून केला आहे. रुदालीसुद्धा हिंदी शब्द आहे. त्यानुसार हे आपला उर बडवत आहेत. हे उर बडवण्यासाठी त्यांनी आमच्या पक्षातले उरबडवे घेतलेत. काँग्रेसचे उरबडवे घेतले. राष्ट्रवादीचे उरबडवे घेतलेत. त्यांनी देशभरात इतर पक्षांतील उरबडवे घेतलेत. कारण शिवसेनेसोबत युती करणारा मूळ भाजप या लोकांनी मारून टाकला, अशक्ष टीका त्यांनी केली. मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस वृत्तीची माणसे आहेत, असे ते म्हणाले.