मुंबई : मराठा आरक्षणावरुन जाती-जातींमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. या समाजाचे दु:ख आपण जाणत असून आरक्षण मिळवून देण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार असल्याची ग्वाही त्यांनी आझाद मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली.

हेही वाचा >>> मुंबई कोणीही तोडू शकत नाही -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

मराठा आरक्षणासाठी उद्या, बुधवारपासून राज्यात पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे याबाबत शिंदे काय बोलतात, याकडे सर्वाधिक लक्ष लागले होते. आपल्या ५३ मिनिटांच्या भाषणाच्या अखेरीस मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाला हात घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार गांभीर्याने हाताळत आहे, यावर विश्वास ठेवा असे सांगत ते व्यासपीठावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाकडे गेले व तेथे नतमस्तक झाले. छत्रपतींच्या साक्षीने त्यांच्या पुतळय़ाची शपथ घेऊन सांगतो, की  मी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार. यावेळी  दोन मिनीटे काय होत आहे, हे कुणाला समजले नाही. व्यासपीठावरील सर्व नेते उभे राहिले. त्यानंतर भाषण पुढे सुरू करताना मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याच्या अविचार करु नये, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार आहे. त्यासाठी इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षणाबाबत सरकारने गठीत केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती अहोरात्र काम करीत आहे. सर्वोच्च न्यायालयातही क्युरिटीव्ह याचिका स्वीकारण्यात आल्याचे उल्लेख शिंदे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरक्षणाच्या माध्यमातून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला अडचणीत आणण्यासाठी अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री