वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात शनिवारी मुंबईत शिवसेना रस्त्यावर उतरली. मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असून आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते. ‘नही चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
देशभरात वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमधील या असंतोषाला शनिवारी शिवसेनेने वाचा फोडली. शिवसेनेने भाजप सरकारविरोधात आक्रमक होत आंदोलनाचे रणशिंग फुकले. मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने केली. सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपविरोधात आंदोलन करुन भाजपला अप्रत्यक्षपणे शहच दिला. शिवसैनिकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
सरकारवर टीका करणारे फलक हातात घेऊन शिवसैनिक निदर्शनस्थळी पोहोचले. आझाद मैदानाजवळ अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आंदोलन केले. पोलिसांनी दोन्ही नेत्यांना आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेच्या आंदोलनावर भाजपने प्रतिक्रिया दिलेली नाही.
देशात महागाईचा आगडोंब… #शिवसेनेचा_मोर्चा #SaveCommonman pic.twitter.com/V4qRatRuWF
— Arvind Sawant (@AGSawant) September 23, 2017
महागाईचा तीव्र निषेध करत मुंबईकर रस्त्यावर… छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर आंदोलन.. #शिवसेनेचा_मोर्चा #SaveCommonman @AUThackeray pic.twitter.com/HFrY5cKFJa
— Arvind Sawant (@AGSawant) September 23, 2017
शिवसेना विभाग क्र 11 च्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी. @AUThackeray pic.twitter.com/VE0lGTRL0S
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 23, 2017
गेल्या आठवड्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सत्तेत राहून कामे होत नसल्याची तक्रार शिवसेना आमदारांनी केली होती. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे शिवसेनेने म्हटले होते. त्यामुळे या आंदोलनाद्वारे भाजपची कोंडी करण्याची खेळी शिवसेनेनी खेळली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्येही शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली. नवरात्रोत्सव सुरु असल्याने शिवसैनिकांनी महागाईच्या भस्मासुराला रस्त्यावर आणत देवीच्या रूपात आलेल्या महिलेकडून त्याचा प्रतिमात्मक वध केला. यावेळी शिवसेना नेते खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईचा भस्मासूर जनतेचा पैसे गिळू लागला आहे. तरीही सरकारचे मात्र भस्मासूराला पोसण्याचे काम करू सुरूच आहे. म्हणूनच शिवसेना जनतेच्या पाठीशी आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस असल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असली तरी वेळोवेळी सरकारच्या चुका त्यांना दाखवून देणार आहे.
