मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शविण्यात आला आहे. अबुधाबी येथे सुरू होणाऱ्या भारत-पाक सामन्यांविरोधात रविवारी आंदोलन पुकारण्यात आले असून ‘माझं कुंकू, माझा देश’ असे नाव या आंदोलनाला देण्यात आले आहे. या सामन्यांविरोधात ठिकठिकाणी निदर्शने करून निषेध नोंदविण्यात येणार आहे.
या आंदोलनाविषयीची माहिती शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश अजूनही संपलेला नाही. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर भाजपमधील हिंदुत्ववादी पाकिस्तानशी संबंध तोडण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे खून आणि क्रिकेट एकाचवेळी चालणार नाही, असा इशारा देत शिवसेनेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे. सामन्याच्याविरोधात रविवारी, महिला आघाडी रस्त्यावर उतरून राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
आबुधाबीमध्ये १४ सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. लोकभावना डावलून हा सामना घेतला जात आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया काश्मीरमध्ये सुरूच असून ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे म्हणजे शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे, तसेच या सामन्याला पाठिंबा देणे म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप राऊत यांनी केला. शिवसेनेने याचा निषेध करत सामन्यांना विरोध केला आहे. या दिवशी शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरून माझं कुंकू माझा देश हे सिंदूरशी संबंधित आंदोलन करणार आहे. त्यानंतर घराघरातून पंतप्रधान मोदी यांना सिंदूर पाठवण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही राऊत यांनी केले.