भारतात घुसून पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला आहे. त्याच वेळी कश्मिरात दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार झाले. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि जवान रोज शहीद होत आहेत. ‘जय जवान आणि जय किसान’चे नारे देण्याचा अधिकार आम्हाला उरला आहे काय? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. पाकिस्तानसारखा टीचभर आणि अराजकात होरपळणारा देश भारताच्या स्वाभिमानाचा रोज कोथळा काढत असताना देशवासीयांना नोटाबंदीच्या गुंगीचे औषध देऊन झोपवता येणार नाही. उत्तर प्रदेशचा राजकीय विजय हा भाजपच्या दृष्टीने दिग्विजय असेलही, पण सीमेवर जवानांच्या ज्या प्रमाणात हत्या होत आहेत हा देशाचा पराभव आहे, अशी टीकाही केली.
यासाठी देशात राजकीय परिवर्तन नाही
शिवसेनेचे मुखपत्र सामनातून उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यावर निशाणा साधला. अरूण जेटली जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हणतात. पण जवानांचे बलिदान हे व्यर्थच चालले असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. वर्षभरात कोणत्याही थेट युद्धाशिवाय हजारावर जवानांचे बळी गेले आहेत. त्या शहीदांच्या शवपेटय़ांवर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी देशात राजकीय परिवर्तन झाले आहे काय? गोहत्येच्या वादात देशाची मने व मनगटे निस्तेज करून जवानांच्या हत्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न म्हणजे राष्ट्राला पिसाळलेल्या लांडग्यांच्या तावडीत देण्यासारखेच आहे. पाकिस्तानचे दहशतवादी व जवान आमच्या लष्करी तळांवर सतत हल्ले करीत आहेत. सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले आहे.
नोटाबंदीनंतर दहशतवाद शतपटीने वाढला
उत्तर प्रदेशच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा इतका वापर केला की, हे सर्जिकल स्ट्राइक जवानांनी नाही तर भाजपच्या मंडळींनीच केले असेच वातावरण निर्माण केले. हीसुद्धा जवानांच्या शौर्याची विटंबनाच होती, असा आरोप त्यांनी केला. नोटाबंदीनंतर पाकिस्तानचे हल्ले व देशांतर्गत दहशतवाद शतपटीने वाढला. गोहत्येचे पातक नको असे ज्यांना वाटते त्यांना जवानांच्या हत्येचे पातक चालते काय?, असा सवाल उपस्थित करत संरक्षण मंत्री व संरक्षण खाते किती गांभीर्याने काम करते, ते माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची पूर्वीची वक्तव्ये आणि त्यांच्या गोव्यात परतण्यावरून स्पष्ट होते, असा टोलाही लगावला. पाकिस्तानकडून आमच्या जवानांचा आणि स्वाभिमानाचा शिरच्छेद सुरूच आहे. राज्य बदलले आहे असे अजूनही वाटत नाही. नोटाबंदीच्या गुंगीतून आणि गोहत्येच्या मारामारीतून देश भानावर येईल त्या दिवशी उशीर झालेला असेल. पाकिस्तानच्या सापळयात आम्ही फसलो आहोत, असे त्यांनी अग्रलेखात म्हटले आहे.