भाजपच्या अडचणी प्रत्येक वेळी समजून घेणार नाही; उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केले.

जनतेने डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यावर मुख्यमंत्रिपदावरून आणखी वाद घातला, तर

जनता अधिक कठोर उपाययोजना करेल, असे परखड मतप्रदर्शनही त्यांनी केले. निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी सत्तासंपादनात शिवसेना आक्रमक राहील आणि सत्तेत निम्मा वाटा मिळावा, असेच सूचित केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असे विचारता ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी ठाकरे यांनी केली. समान सत्तावाटपाचे सूत्र पारदर्शकपणे ठरल्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जागावाटपात निम्म्या जागा आणि सत्तेचे समान वाटप असेच सूत्र ठरले होते. पण निम्म्या जागा देण्यात भाजपपुढे अडचणी असल्याने तडजोड करण्याची विनंती पाटील यांनी केली होती. पण आता मी भाजपच्या अडचणींचा प्रत्येक वेळी विचार करू शकत नाही. माझ्या पक्षाच्या वाढीकडे पाहिले पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट करीत मुख्यमंत्रिपदाचेही समसमान वाटप व्हावे, असेच संकेत दिले. मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे मी वेडेवाकडे काही करणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. जनतेला गृहीत धरून काही लोक चालायला लागतात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम जनता करते. सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात जनतेने या निकालातून झणझणीत अंजन घातले आहे. डोळे चुरचुरत असताना मुख्यमंत्रिपदावरून भांडत राहिल्यास जनता आणखी कठोर उपाय करेल, असे ठाकरे यांनी सुनावले. काही चुका झाल्या असतील, तर त्या सुधारल्या जातील, असे सांगून आदित्य ठाकरे यांच्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.

‘मातोश्री‘च्या अंगणातील पराभवाबद्दल खेद :

वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील पराभवाने धक्का बसला असल्याचे सांगून ठाकरे यांनी खेद व्यक्त केला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवाप्रमाणेच हा पराभवही आश्चर्यकारक असून त्याबाबत विचार केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

जनतेला गृहीत धरून काही लोक चालायला लागतात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम जनता करते.  जनतेने डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यावर मुख्यमंत्रिपदावरून आणखी वाद घातला, तर जनता अधिक कठोर उपाययोजना करेल. समान सत्तावाटपाचे सूत्र पारदर्शकपणे ठरल्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल. उद्धव ठाकरे