मंगल हनवते
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने तयार केलेला शिवडी – एलिफंटा रोप वे प्रकल्पाचा प्रस्ताव गेल्या दोन-अडीच वर्षांपासून केंदीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पाला काही तांत्रिक कारणांमुळे परवानगी मिळू शकलेली नाही. हा तिढा सोडविण्यासाठी बंदर प्राधिकरण प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही तोडगा निघू न शकल्यामुळे हा प्रकल्प कागदावरच आहे.
एलिफंटाला जाण्यासाठी जलवाहतुकीबरोबरच अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याचा मुंबई बंदर प्राधिकरणाचा मानस आहे. त्यासाठी रोप वेची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेनुसार शिवडी – एलिफंटादरम्यान अंदाजे ८ कि.मी. लांबीचा रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प जगातील सर्वाधिक लांबीचा रोप वे प्रकल्प ठरेल असा दावाही करण्यात आला होता. शिवडी आणि एलिफंटा या दोन स्थानकांचा त्यात समावेश असणार आहे. या प्रकल्पासंबंधीचा प्रस्ताव बंदर प्राधिकरणाने दोन-अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. मात्र प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
या प्रकल्पातील एलिफंटा स्थानकासाठी एलिफंटा लेण्यांनजीक बांधकाम करावे लागणार आहे. मात्र हा परिसर जागतिक पुरातन वारसा वास्तूंमध्ये मोडत असल्याने लेण्यांच्या आसपास एक किमी क्षेत्रात कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बांधकामास पर्यायाने प्रस्तावास मंजुरी नाकारण्यात आली आहे. परिणामी, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. असे असले तरी बंदर प्राधिकरण हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. एकीकडे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाबरोबर बंदर प्राधिकरणाची चर्चा सुरू आहे.
एलिफंटा लेण्यांच्या परिसराच्या एक किमीच्या कक्षेत कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही. असे असताना आम्हाला ५०३ मीटरच्या कक्षेत बांधकाम करावे लागणार आहे. त्यामुळे परवानगीचा तिढा निर्माण झाला आहे. मागच्या आठवडय़ातच पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाशी चर्चा करण्यात आली होती. यातून काही तोडगा निघतो का याची चाचपणी करण्यात येत आहे. सध्यातरी हा प्रकल्प ‘जैसे थे’ आहे.
– राजीव जलोटा, अध्यक्ष, मुंबई बंदर प्राधिकरण
