मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन दिलेल्या आदेशानुसार मुंबई पारबंदर प्रकल्पाअंतर्गत (शिवडी-न्हावाशेवा सागरीसेतू) उभारण्यात येणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामाला कामाला वेग देण्यात आला आहे. पारबंदर प्रकल्प २०२३ अखेरीस पूर्ण करण्याचा संकल्प एमएमआरडीएने सोडला आहे. त्यामुळे पारबंदर प्रकल्पाला जोडण्यात येणाऱ्या उन्नत मार्गाचे काम तत्पूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे उन्नात मार्ग नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्याचे आदेश महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिले. दरम्यान, आतापर्यंत या मार्गाचे २४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा- विश्लेषण : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ झाली, पण… खटुआ समितीच्या इतर शिफारशींचे काय?
दक्षिण मुंबईतून शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर जलद गतीने पोहचण्यासाठी ४.५ किमी लांबीचा आणि कुठेही सिग्नल यंत्रणा नसलेल्या शिवडी-उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. हा मार्ग मुंबई महानगरपालिकेच्या सागरी मार्गालाही जोडण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पाचे २४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी प्रभादेवी परिसरातील सुमारे ७५० झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कामाला वेग देऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- नामफलक मराठीत नसल्यास आता कारवाई?; दुकानांवरील पाटय़ांबाबत अंमलबजावणीचा आज शेवटचा दिवस
मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उन्नत मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाला वेग देण्याचे आदेश दिले. तसेच प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आदेशही त्यांनी एमएमआरडीएला दिले. दरम्यान, हे काम ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.