मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणात सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बची चर्चा सुरू झाली आहे. सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपाला आता खुद्द अनिल परब यांनीच पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. “जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत”, असं अनिल परब म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एनआयए, नार्कोटिक्स..कोणत्याही चौकशीला तयार”

दरम्यान, यावेळी बोलताना अनिल परब यांनी आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. “सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितलं नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्टोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे. माझी चौकशी करावी आणि चौकशीत सत्य बाहेर येईल”, असं परब पत्रकार परिषदेत म्हणाले.

“सचिन वाझेंनी पहिला आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मी मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी त्या नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत”, असं ते म्हणाले.

पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

भाजपाला वाझेंच्या पत्राबद्दल आधीच माहिती होतं?

दरम्यान, भाजपाला सचिन वाझेंच्या पत्राविषयी आधीच माहिती होतं, असा आरोप यावेळी अनिल परब यांनी केला आहे. “गेले २-३ दिवस भाजपाचे पदाधिकारी आरडा-ओरडा करत होते की आता (संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर) आम्ही तिसरा बळी घेऊ. म्हणजे त्यांना काही दिवसांपासून या गोष्टीची कल्पना आहे. त्यांनी हे प्रकरण सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केलं आहे. सचिन वाझे आज पत्र देणार होते, याची कल्पना बहुतेक त्यांना आधीच असेल”, असा दावा अनिल परब यांनी केला.

काय आहे सचिन वाझेंच्या पत्रात?

अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि त्यानंतर घडलेली मनसुख हिरेन यांची हत्या या प्रकरणामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. सचिन वाझेंनी एनआयएलाच एक पत्र लिहून त्यातून गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या पुनर्नियुक्तीला शरद पवार यांचा विरोध होता. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठीच अनिल देशमुख यांनी माझ्याकडे २ कोटींची खंडणी मागितली होती”, असा खळबळजनक आरोप सचिन वाझेंनी केला आहे. त्यासोबतच, “अनिल परब यांनी देखील मुंबई महानगर पालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितलं होतं”, असं देखील सचिन वाझेंनी पत्रात नमूद केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena anil parab on sachin vaze letter to nia allegations on anil deshmukh pmw
First published on: 07-04-2021 at 18:55 IST